ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. ट्वेंटी-20 मालिकेत यजमान भारताचे पारडे जड मानले जात आहे. भारतीय संघाने 2016च्या दौऱ्यात कांगारूंना त्यांच्याच भूमीत ट्वेंटी-20 मालिकेत 3-0 असे यश मिळवले होते. मात्र, दोन वर्षांत दोन्ही संघात बरेच बदल झालेले आहेत. भारतीय संघात महेंद्रसिंग धोनीची उणीव जाणवणारी आहे. तरीही भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2016च्या कामगिरीच्या पुनरावृत्तीसाठी प्रयत्नशील आहे. या मालिकेत यश मिळवून आयसीसी ट्वेंटी-20 क्रमवारीत भारताला अव्वल स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या जवळ जाण्याची संधी आहे. पण, हे वाटतं तितकं सोपं नक्की नाही.
संघासह खेळाडूंच्या क्रमवारीतही बदल पाहायला मिळेल. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच ट्वेंटी-20 फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, त्याला पाकिस्तानच्या बाबर आझमकडून अव्वल स्थान हिसकावण्याची संधी आहे. भारताचा लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावर आहे आणि युजवेंद्र चहलही गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे.
मालिकेतील निकालानंतर आयसीसी क्रमवारीत असं दिसेल चित्र
- भारत 3-0 ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने या मालिकेत निर्भेळ यश मिळवले तर त्यांच्या खात्यात दोन गुणांची भर पडेल. भारतीय संघ सध्या 127 गुणांसह दुसऱ्या स्थानवर आहे आणि ऑस्ट्रेलियाला नमवल्यास त्यांची गुणसंख्या 129 अशी होईल. पाकिस्तान 138 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची मात्र दोन स्थानांनी घसरण होईल.
- भारत 2-1 ऑस्ट्रेलिया: ट्वेंटी-20 मालिकेत भारताला एक पराभव पत्करावा लागला तरी क्रमवारी आणि गुणसंख्या जैसे थे राहील. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाही चौथ्या स्थानी कायम राहील, परंतु त्यांना एका गुणाचा फटका बसेल.
- भारत 1-2 ऑस्ट्रेलियाः विराटसेनेला 1-2 असा पराभव पत्करावा लागला तरी दुसरे स्थान अबाधित राहील, परंतु ऑस्ट्रेलियाचा संघ 119 गुणांसह एक स्थान वर सरकेल. भारताचे दोन गुण वजा होतील.
- भारत 1-1 ऑस्ट्रेलियाः एक सामना रद्द होऊन दोन्ही संघांनी एकेक सामना जिंकल्यास संघांच्या क्रमवारीत बदल होणार नाही.