BCCIच्या निवड समितीनं सोमवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या ट्वेंटी-20, वन डे व कसोटी संघात दुखापतीमुळे रोहित शर्मा व इशांत शर्मा यांना स्थान दिलेले नाही. सूर्यकुमार यादवला चांगल्या खेळीनंतरही संधी देण्यात आलेली नाही. मोहम्मद सिराजला कसोटी संघात संधी मिळाली, तर वरुण चक्रवर्थीला ट्वेंटी-20 संघात पदार्पणाची संधी मिळाली आहे. लोकेश राहुलचे कसोटी संघात पुनरागमन झाले असून मर्यादित षटकांच्या सामन्यांत रोहितच्या अनुपस्थितीत लोकेशकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहितचे संघात नाव नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याची दुखापत गंभीर असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळेच रोहित IPL 2020मधूनही माघार घेईल, अशी चर्चा सुरू होती. पण, मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) रोहितचा सराव करतानाचा फोटो पोस्ट करून हिटमॅन फिट असल्याचे संकेत दिले.
रोहितच्या दुखापतीवरून त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या संघात स्थान देण्यात आलेले नसताना मुंबई इंडियन्सनं त्याचा सरावाचा फोटो पोस्ट करून BCCI विरोधात कंबर कसल्याचे दाखवले. त्यामुळे आता रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कमबॅक करू शकतो, असे सूत्रांनी सांगितले. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहितला हॅमस्ट्रींगची दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो दोन सामन्यांना मुकला होता. त्यामुळेच त्याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या तीनही संघात समावेश केला गेला नाही. पण, त्याचवेळी रोहित आणि इशांत यांच्या दुखापतीवर वैद्यकिय अधिकारी लक्ष ठेवून राहतील, असे बीसीसीआयनं स्पष्ट केलं होतं.
मुंबई इंडियन्स ( MI) १४ गुणांसह सध्या गुणतक्त्यात अव्वल स्थानावर आहे आणि प्ले ऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. रोहित सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ( Sunrisers Hyderabad) खेळणार असल्याची शक्यता वाढली आहे. ''आयपीएलच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत खेळला तर ते त्याची तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे आणि त्यानंतर निवड समिती ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याच्या नावाचा विचार करण्याची शक्यता आहे,''असे मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले.
ट्वेंटी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल ( उपकर्णधार व यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्थी.
वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर.
कसोटी संघ - विराट कोहली, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान सहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
या दौऱ्यासाठी चार अतिरिक्त गोलंदाज - कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, इशान पोरेल, टी नटराजन