रोहित शर्माची दुखापत एवढी गंभीर नाही, मग ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ५ आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना त्याला का वगळले? टीम इंडियातून वगळ्याएवढी रोहितची दुखापत गंभीर आहे, मग तो अजून UAEत काय करतोय? तो बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचारासाठी का रवाना झाला नाही? असे अनेक प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत. त्यात आज तो खेळेल की नाही, यावरही संभ्रम आहेच. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड समिती टीम इंडियाची घोषणा करण्याच्या एक दिवसपूर्वी संघाचे फिजिओ नितिन पटेल यांनी रोहित शर्मा अन् इतर खेळाडूंबाबत एक रिपोर्ट सादर केला आणि त्यानंतर टीम निवडण्यात आली. असं काय होतं या रिपोर्टमध्ये?
BCCIच्या निवड समितीनं सोमवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या ट्वेंटी-20, वन डे व कसोटी संघात दुखापतीमुळे रोहित शर्मा व इशांत शर्मा यांना स्थान दिलेले नाही. सूर्यकुमार यादवला चांगल्या खेळीनंतरही संधी देण्यात आलेली नाही. मोहम्मद सिराजला कसोटी संघात संधी मिळाली, तर वरुण चक्रवर्थीला ट्वेंटी-20 संघात पदार्पणाची संधी मिळाली आहे. लोकेश राहुलचे कसोटी संघात पुनरागमन झाले असून मर्यादित षटकांच्या सामन्यांत रोहितच्या अनुपस्थितीत लोकेशकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रिषभ पंतनं मर्यादित षटकांच्या संघातील स्थान गमावले आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे Official वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारीख, वेळ, ठिकाण!
नितिन पटेल यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सर्व खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत एक अहवाल बीसीसीआय व निवड समितीला दिला. त्यात त्यांनी रोहित निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे नमूद केले होते. त्यानुसार संघ निवडीत रोहित शर्मा व इशांत शर्मा यांना वगळण्यात आले. पण, तासाभरातच मुंबई इंडियन्सनं रोहितचा सराव करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि बीसीसीआय व निवड समिती यांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे निवड समितीवर टीका होऊ लागली. पटेल आणि अन्य दोन डॉक्टर्संनी रोहितच्या दुखापतीची पाहणी केली आणि त्या सर्वांनी त्याला तीन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
त्यानुसार पटेल यांनी वैद्यकिय अहवाल निवड समितीकडे सोपवला. ''पटेल यांनी सर्व खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा वैद्यकिय अहवाल दिला. कोणता खेळाडू फिट आहे आणि कोणता नाही, हे फिजिओंनी सांगायचे असते आणि यात नवीन असे काहीच नाही. त्यानुसार रोहित दुखापतीमुळे संघ निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे आम्हाला सांगण्यात आहे. पटेल यांनी दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा अहवाल तयार केला. त्यात दोघांनीही रोहितला २-३ आठवड्यांची विश्रांती आवश्यक असल्याचे सांगितले,''अशी माहिती सूत्रांनी दिली.