ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाला एकामागून एक धक्के बसत आहेत. दुखापतीमुळे रोहित शर्माचा या दौऱ्यासाठी संघात समावेश न करण्यात आल्यानंतर आता आणखी एक वृत्त समोर येत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परतणार आहे. BCCIनं विराट कोहलीची पितृत्व रजा मान्य केली आहे. त्यामुळे कोहली तीन कसोटीला मुकणार आहे. बीसीसीआयनं येत्या रविवारी त्या संदर्भात तातडीची बैठक बोलावून काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यानुसार रोहित शर्माचा कसोटी मालिकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
26 ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत कर्णधार कोहलीनं अॅडलेड कसोटीनंतर मायदेशात परतण्याचे निवड समितीला सांगितले होते. बीसीसीआयनं त्याची पितृत्व रजा मान्य केली आहे. त्यामुळे 17 ते 21 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या पहिल्या कसोटीनंतर कोहली मायदेशात परतणार आहे. अनुष्का प्रेग्नेंट असून जानेवारीत बाळ होणार असल्याचे या दोघांनी आधीच जाहीर केले होते. त्यामुळे पहिल्या बाळाच्या जन्मासाठी कोहली अनुष्कासोबतच राहणार आहे.
- रोहित शर्माच्या दुखापतीवर बीसीसीआयची मेडिकल टीम लक्ष ठेवून आहे. त्यामुळेच त्याला वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती देण्याचा निर्णय झाला असून कसोटी संघात त्याला स्थान देण्यात आले आहे.
- वन डे संघात संजू सॅमसन याची अतिरिक्त यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
- इशांत शर्मा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे आणि पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात येईल, असे बीसीसीआयनं स्पष्ट केलं.
- वरुण चक्रवर्थीला खांद्याच्या दुखापतीमुळे ट्वेंटी-20 मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी टी नटराजनचा ट्वेंटी-20 संघात समावेश करण्यात आला आहे.
- वृद्धीमान साहाच्या दोन्ही हॅमस्ट्रींगला दुखापत झाली असून त्याच्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल. कमलेश नागरकोटी यालाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाता येणार नाही.
सुधारित संघट्वेंटी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन
वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन
कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज