इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला होणार आहे. मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे, तर दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातल्या सामन्यातून दुसरा फायनलिस्ट ठरणार आहे. आयपीएलनंतर टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. ११ नोव्हेंबरला प्रायव्हेट विमानानं टीम इंडियाचे खेळाडू तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात रवाना होतील. रोहित शर्मा फिट असूनही त्याला या दौऱ्यासाठी न निवडल्यानं वाद सुरू असताना आता टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील केवळ दोनच सामने खेळणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला कसोटी सामना १७-२१ डिसेंबर या कालावधीत अॅडलेड ओव्हल येथे होणार आहे, त्यानंतर २६ ते ३० डिसेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दुसरा सामना होईल. पण, त्यानंतरच्या सिडनी ( ७-११ जानेवारी २०२१) व ब्रिस्बेन ( १५-१९ जानेवारी २०२१) कसोटीत कोहली खेळणार नाही. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या तीनही संघाचे नेतृत्व कोहलीकडे सोपवण्यात आले आहे, परंतु आता उर्वरित दोन सामन्यांत अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. PTI नं दिलेल्या वृत्तानुसार कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) सह मायदेशी परतण्याची शक्यता आहे. अनुष्का प्रेग्नेंट असून जानेवारीत बाळ होणार असल्याचे या दोघांनी आधीच जाहीर केले होते. त्यामुळे पहिल्या बाळाच्या जन्मासाठी कोहली अनुष्कासोबतच राहणार आहे. अनुष्का सध्या दुबईत आहे, परंतु ती ऑस्ट्रेलियात जाणार नाही.
बीसीसीआयच्या सूत्रांनी PTIला सांगितले की,'विराटला अंतिम दोन सामने खेळू न देण्याची परवानगी देण्यास आम्हाला काहीच हरकत नाही. जानेवारी २०२१मध्ये विराट-अनुष्का आई बाबा बनणार आहेत. कुटूंब हे पहिलं प्राधान्य, हेच बीसीसीआयचं म्हणणं आहे. त्यामुळे जर कर्णधार कोहलीला पितृत्व रजा घ्यायची असेल, तर तो केवळ पहिल्या दोन कसोटीसाठीच उपलब्ध असेल.''
याआधी मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बीसीसीआयनं रोहित शर्माला पितृत्व रजा दिली होती आणि रोहित चौथ्या कसोटीत खेळला नव्हता. पण, त्यानंतर तो वन डे व ट्वेंटी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात परतला होता.
ट्वेंटी-20 मालिका४ डिसेंबर - मानुका ओव्हर, कॅनबेरा, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून६ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून८ डिसेंबर - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - दुपारी १.४० वाजल्यापासून ६-८ डिसेंबर - भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए , वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून११-१३ डिसेंबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून
कसोटी मालिका १७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ - सकाळी ९.३० वाजल्यापासून २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून
या दौऱ्यासाठी निवडलेला भारतीय संघ ( Team India for Australia Tour)
ट्वेंटी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल ( उपकर्णधार व यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्थी.
वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर.
कसोटी संघ - विराट कोहली, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान सहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
या दौऱ्यासाठी चार अतिरिक्त गोलंदाज - कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, इशान पोरेल, टी नटराजन