India Tour of England - भारतीय संघातील खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर २० दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. न्यूझीलंडकडून WTC Final मध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यानंतर आता टीम इंडिया ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याची एक मागणी इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) मान्य केली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला कसोटी मालिकेत पराभूत करणे यजमान इंग्लंडसाठीच आव्हानात्मक होणार हे नक्की आहे.
WTC Finalनंतर पुरेसा सराव न मिळाल्याची खंत विराटनं व्यक्त केली होती. त्याचवेळी त्यानं इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी आयोजित सराव सामना का रद्द केले, याबाबतही नाराजी व्यक्त केली. त्यानंतर बीसीसीआयनं ECBशी पुन्हा चर्चा केली आणि आता भारतीय संघासाठी दोन सराव सामन्यांचे आयोजन करणार असल्याची बातमी समोर येत आहे. ECBनं चार दिवसीय दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना डरहॅम येथील एमिरेट्स रिव्हरसाईड येथे एकत्र येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
WTC जिंकल्यानंतर विराट कोहलीच्या खांद्यावर का टेकलं डोकं?; केन विलियम्सनच्या उत्तरानं जिंकली मनं!
टीम इंडियासाठीचे दोन्ही सराव सामने डरहॅम येथे खेळवले जातील. पहिला सराव सामना कोणत्या क्लबविरुद्ध होईल, हे अद्याप ठरलेले नाही, पण दुसऱ्या सराव सामन्यात टीम इंडिया कौंटी स्पर्धेतील सर्वोत्तम ११ खेळाडूंचा सामना करेल. ''टीम इंडियासाठी सराव सामन्याच्या आयोजनासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच हे सामने खेळण्याचा आमचा प्रयत्न आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, '' असे ECBच्या प्रवक्त्यांनी डेली मेलला सांगितले.
भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला