India Tour of England : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय खेळाडूंची सुट्टी आज संपत आहे. २० दिवसांच्या सुट्टीनंतर भारतीय खेळाडू अन् त्यांचे कुटुंबीय पुन्हा बायो बबलमध्ये दाखल झाले असून त्या सर्वांची पुन्हा कोरोना चाचणी केली जाणार आहे. ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी भारतीय खेळाडू कौटी क्लबविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानं तर सरावाला सुरुवात केली असून त्यानं सुट्टी कमी करून कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. तो सध्या सरे क्लबकडून कौंटी क्रिकेट खेळत आहे आणि सोमरसेट क्लबला दुसऱ्या डावात त्यानं दणके दिले आहेत. ( R Ashwin has taken a five-wicket haul for Surrey v Somerset in the 2nd innings)
११ जुलैपासून या सामन्याला सुरुवात झाली अन् आर अश्विननं पहिलेच षटक टाकून इतिहास घडवला. कौंटी क्रिकेटच्या इतिहासात ११ वर्षांनंतर एकाद्या फिरकीपटूनं डावाचे पहिले षटक फेकलं होतं. पण, आर अश्विनला पहिल्या डावात फार कमाल करता आली नाही. त्यानं ४३ षटकांत ९ निर्धाव षटकं फेकताना ९९ धावांत फक्त १ विकेट घेतली. सोमरसेटनं पहिल्या डावात ४२९ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात सरेला २४० धावाच करता आल्या. अश्विनला फलंदाजीतही ( ०) योगदान देता आलं नाही. पण, त्याची उणीव त्यानं दुसऱ्या डावात भरून काढली. त्यानं दुसऱ्या डावात सोमरसेट क्लबला मोठे धक्के दिले. १३ षटकांत ४ निर्धाव षटकं फेकून अश्विननं २३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे सोमरसेटची दुसऱ्या डावात ७ बाद ६० अशी दयनीय अवस्था झाली आहे. त्यांनी २४९ धावांची आघाडी घेतली आहे.