India Tour of England : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या विराट अँड कंपनीच्या सराव सामन्यालाही आजपासून सुरुवात झाली. सराव सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे. रोहितनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण, या सामन्यात भारताचे दोन खेळाडू प्रतिस्पर्धी कौंटी एकादश संघाकडून खेळत आहेत. या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू दंडावर काळी फित बांधून मैदानावर उतरले. काही दिवसांपूर्वी १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य यशपाल शर्मा यांचे निधन झाले आणि त्यांना आदरांजली म्हणून टीम इंडियाच्या खेळाडूंनी काळी फित बांधली.
४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या तयारीलाही टीम इंडिया आजपासून सुरूवात करणार आहे. टीम इंडिया विरुद्ध कौंटी एकादश यांच्यातला तीन दिवसांचा सराव सामनाही आजपासून सुरू होत आहे. रिषभ पंतचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला असला तरी तो पहिल्या सराव सामन्यात खेळणार नाही. त्याची आणखी एक कोरोना चाचणी होईल आणि ती निगेटिव्ह आल्यानंतर तो संघासोबत सराव करण्यास सुरुवात करेल. वृद्धीमान सहा हाही विलगिकरणात असल्यानं सराव सामन्यात लोकेश राहुल यष्टिरक्षकाच्या भूमिकेत दिसेल.
मयांक अग्रवाल सराव सामन्यात रोहितसह सलामीला येणार आहे. अजिंक्य रहाणेलाही विश्रांती दिली आहे. मोहम्मद शमी, आर अश्विन हेही या सामन्यात नाहीत. वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान ही दोघं कौंटी एकादश संघाकडून खेळत आहेत. कर्णधार रोहित शर्मा ९ धावांवर असताना पूल शॉट मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद होऊन माघारी परतला. भारताला ३३ धावांवर पहिला धक्का बसला.