भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्याच्या मैदानात रंगणार आहे. त्यानंतर या द्विपक्षीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना हा मुंबईत होणार आहे. या सामन्याआधीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कुणाला संधी मिळणार ते निश्चित होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याचा अर्थ 'पुणे-मुंबई मार्गावर'च टीम इंडियातील कोणत्या खेळाडूंना खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं तिकीट द्याययं ते फायनल होणार आहे. पुण्यातील कसोटीनंतरच फायनल केला जाणार संघ?
क्रिकबझच्या वृत्तानुसार, पुण्यातील मैदानात रंगणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर निवड समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीतच म्हणजे मुंबई कसोटी सामन्याआधीच बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कुणाला संधी मिळणार ते निश्चित होणार आहे.
पुजारा असेल चर्चेचा विषय
28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत खेळाडूंचा फॉर्म, तंदुरुस्ती आणि संघ बांधणीसंदर्भातील प्रश्न सोडवण्यात येणार आहेत. यात चेतेश्वर पुजारासंदर्भातील मुद्दाही चर्चेचा ठरेल. सध्याच्या घडीला चेतेश्वर पुजारा टीम इंडियाचा भाग नाही. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी त्याने रणजी करंडक स्पर्धेत द्विशतकी खेळीसह पुन्हा टीम इंडियात एन्ट्रीची दावेदारी भक्क केली आहे.
या कारणामुळे पुजाराची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
२०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजारानं दमदार कामगिरी करून दाखवली होती. यावेळी त्याने ५२१ धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर २०२०-२१ दौऱ्यातही पुजारा टीम इंडियासाठी संकटमोचक ठरला होता. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील त्याने केलेली दमदार कामगिरी आणि ऑस्ट्रेलियातील मजबूत रेकॉर्ड यामुळे त्याला कमबॅकची संधी मिळू शकते. ३६ वर्षीय फलंदाजाने रणजी करंडक स्पर्धेत छत्तीसगड विरुद्धच्या सामन्यात ३८३ चेंडूत २३४ धावांची खेळीकेली होती.
गोलंदाजीत या खेळाडूंना मिळेल पसंती
गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांची वर्णी लागणं जवळपास निश्चित मानले जात आहे. याशिवाय आवेश खान आणि यश दयाल यासारखे खेळाडूही शर्यतीत आहे. मोहम्मद शमी स्वत:ला फिट असल्याचे सांगत असला तरी तो ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार असल्याचे दिसते. रोहित शर्मानं त्याच्यासंदर्भातील भूमिका आधीच स्पष्ट केली आहे.