India Tour of England : भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर दाखल झाला आहे आणि २४ तारखेपासून सुरू होणाऱ्या चार दिवसीय सराव सामन्यासाठी खेळाडूंनी सरावालाही सुरूवात केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १ ते ५ जुलै या कालावधीत इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. मागच्या वर्षी स्थगित करावी लागलेली पाचवी कसोटी १ जुलैपासून सुरू होत आहे आणि भारतीय संघ मालिकेत २-१ असा आघाडीवर आहे. भारताला इंग्लंडमध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. अशाच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याने टीम इंडियाच्या खेळाडूंना सतर्क राहण्यास सांगितले आहे. द्रविडने यावेळी इंग्लंड संघाचे कौतुक केले आहे.
मागच्यावर्षी ज्या इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ खेळता त्यात आणि आताच्या संघात जमिन आसमानचा फरक आहे, असे द्रविडने मान्य केले. इंग्लंडचे नेतृत्व आता बेन स्टोक्सकडे आहे, तर मुख्य प्रशिक्षक म्हणून ब्रेंडन मॅक्युलम याची नियुक्त करण्यात आली आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर न्यूझीलंड व श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकली, परंतु दक्षिण आफ्रिकेत १-२ अशी हार मानावी लागली. इंग्लंडला अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने ४-० असे लोळवले, तर वेस्ट इंडिज दौऱ्यावरही ते ०-१ असे हरले. त्यानंतर स्टोक्सकडे कसोटीचे नेतृत्व गेले आणि सध्या घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
''कसोटी सामना रोमांचक होणार आहे. आमच्यासाठी हा केवळ एक कसोटी सामना नाही, तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ( WTC) गुण आहेत. मागच्या वर्षी जे इंग्लंड दौऱ्यावर खेळलेत त्यांच्यासाठी ही तिच मालिका आहे आणि ते ही जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहेत,''असे द्रविड म्हणाला. ''इंग्लंडमध्ये कसोटी खेळणे नेहमीच आवडते. येथील प्रेक्षक फनटास्टीक आहेत. इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटला नेहमी गर्दी झालेली दिसते आणि सध्या इंग्लंडचा संघही चांगला खेळतोय. ते खरंच खूप चांगलं खेळत आहेत, असे मला म्हणायचेय,'' असेही तो म्हणाला.
मागच्या वर्षी इंग्लंडचा संघ बॅकफूटवर होता, परंतु तो संघ अन् आताचा संघ यात फरक आहे. इंग्लंडचा संघ सध्या निर्भयपणे खेळतोय, याची आठवण द्रविडने भारतीय संघाला करून दिली. ''मागच्या वर्षीच्या तुलनेल इंग्लंडचा आताचा संघ वेगळा आहे. मागच्या वर्षी इंग्लंडचा संघ बॅकफूटवर होता, परंतु आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील त्यांचा खेळ पाहून ते निर्भय दिसत आहेत. आमचाही संघ काही कमी नाही. आशा करतो की एक चांगला सामना पाहायला मिळेल. मला कसोटी क्रिकेट पाहायला, खेळायला आणि आता मार्गदर्शन करायला आवडतो,''असे द्रविड म्हणाला.