India Tour of England : कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याचे मागील आठवड्यात लंडनला जाणारे विमान चुकले. पण, आता तो येत्या काही दिवसांत लंडन येथे दाखल होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. भारतीय संघ २४ जूनपासून लेईसेस्टर क्लबविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे आणि या सामन्यात अश्विन खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १ जुलैपासून भारत-इंग्लंड यांच्यातला पाचवा कसोटी सामना सुरू होतोय आणि मालिकेचा निकाल लागण्याच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे.
चेन्नईचा फिरकीपटू आर अश्विन मागील १६ जूनला भारतीय खेळाडूंसोबत मुंबई येथून लंडनला रवाना होणार होता, परंतु त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला प्रवास करता आला नाही. आता बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने आर अश्विनच्या लंडनच्या प्रवासाची सोय करण्यात आल्याचे Cricbuzz ला सांगितले आहे. अश्विन तंदुरुस्त न झाल्यास जयंत यादव याला स्टँडबाय राहण्यास सांगितले आहे. हरयाणाचा फिरकीपटू जयंत यादवला बंगलोरच्या NCA मध्ये बोलावले गेले आहे. जर अश्विन फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला, तर जयंत यादवला पाठवण्यात येईल. अश्विनच्या नावावर ८६ कसोटींत ४४२ विकेट्स आहेत.
राहुल द्रविड व श्रेयस अय्यर लेईसेस्टरला पोहोचलेदक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका आटपून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व फलंदाज श्रेयस अय्यर आज लेईसेस्टर येथे दाखल धाले. १९ जूनला अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर हे त्वरित लंडनसाठी रवाना झाले होते. राहुल द्रविडने आज लेईसेस्टर येथे खेळाडूंना मार्गदर्शन केले.