KL Rahul, India Tour of England: दक्षिण आफ्रिकेविरूद्धची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटल्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेले खेळाडू रवाना झाले. यष्टिरक्षक- फलंदाज रिषभ पंत, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे लंडनसाठी रवाना झाले आहेत. 1 ते 5 जुलै या कालावधीत भारत-इंग्लंड कसोटी सामना रंगणार आहे आणि तो सामना जिंकून भारताला ऐतिहासिक मालिका जिंकण्याची संधी आहे. पण, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर लोकेश राहुल याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे त्याची रिप्लेसमेंट कोणता खेळाडू करेल, याची उत्सुकता होती. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघ व्यवस्थापनाने चकित करणारा निर्णय घेतला आहे.
सीनियर खेळाडूंना विश्रांती दिल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी लोकेशकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण, मालिकेपूर्वीच त्याच्या दुखापतीने डोकं वर काढलं अन् त्याला माघार घ्यावी लागली. तो थेट बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला. पण, वेळेत त्याची दुखापत बरी न झाल्याने त्याला इंग्लंड दौऱ्यालाही मुकावे लागले. BCCI त्याला पुढील उपचारांसाठी जर्मनीला पाठवण्याच्या तयारीत आहेत.
अशात एडबस्टन कसोटीत रोहित शर्मा ( Rohit Sharma) सोबत सलामीला कोण येणार याची सर्वांना उत्सुकता होती. लोकेशला रिप्लेसमेंट म्हणून मयांक अग्रवालचे ( Mayank Agarwal) नाव चर्चेत होते, परंतु संघ व्यवस्थापनाने त्याला स्टँडबाय राहण्यास सांगितले. तो संघासोबत प्रवास करणार नाही. संघात शुबमन गिल ( Shubman Gill) हा एक सलामीवीर असताना दुसरा ओपनर घेण्याची गरज नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे एडबस्टन कसोटीत रोहितसह शुबमन सलामीला पुन्हा दिसण्याची शक्यता बळावली आहे. विराट कोहली, गिल, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आदी खेळाडू आधीच लंडनमध्ये दाखल झाले होते आणि ते सरावालाही लागले आहेत. 24 जूनपासून लेईसेस्टरशायर क्लबविरुद्ध चार दिवसीय सराव सामना होणार आहे. ''मयांक अग्रवाल हा स्टँडबाय राहणार आहे. एकच कसोटी असल्यामुळे संघ व्यवस्थापनाला आणखी एक खेळाडू संघात घेण्याची गरज वाटत नाही. त्याला घेऊन जाऊन, न खेळवणे व्यवस्थापनाला पटत नाही, परंतु जर एकादी दुखापत झाली, तर तो इंग्लंडसाठी रवाना होईल,''असे बीसीसीआयने सांगितले.
- चार दिवसीय सराव सामना वि. लेइसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब - २४ ते २७ जून
- भारत अ वि. डर्बिशायर ट्वेंटी-२० - १ जुलै
- पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, के एस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा