India vs South Africa Head to Head Record In T20Is : एका बाजूला भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पोहचला आहे. बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेआधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना दक्षिण आफ्रिकेत रंगणाऱ्या टी-२० मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे. भारतीय संघ पहिल्यांदाच सलग दुसऱ्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० मालिका खेळताना दिसणार आहे. एक नजर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील आकडेवारीवर...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच भारतीय संघानं खेळला पहिला टी-२० सामना
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना हा २००६ मध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात सचिन तेंडुलकरही टीम इंडियाचा भाग होता. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील भारतीय संघाचा हा पहिला वहिला सामना होता. ज्यात भारतीय संघानं ६ विकेट्सनं विजय मिळवला होता.
भारतीय संघाने जिंकलेत सर्वाधिक सामने
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण २७ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. यातील १५ सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली आहे. तर ११ सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. एक सामना हा अनिर्णितही राहिला आहे.
संघाच्या सर्वोच्च अन् निच्चांकी धावसंख्येचा विक्रम कुणाच्या नावे?
दोन्ही संघात आतापर्यंत रंगलेल्या टी-२० सामन्यात सर्वोच्च धावसंख्येसह निच्चांकी धावसंख्याचा रेकॉर्ड हा भारतीय संघाच्या नावे आहे. गुवाहटीच्या मैदानात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ बाद २३७ धावा केल्या होत्या. याशिवाय भारतीय संघ ९२ धावांवरही आटोपल्याचे पाहायला मिळाले होते. ही दोन्ही संघातील टी-२० सामन्यात नोंदवली गेलेली निच्चांकी धावसंख्या आहे.
टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेतील कामगिरी
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत ५ टी-२० मालिका खेळल्या आहेत. यात फक्त एक मालिकाच टीम इंडियाने गमावली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात भारतीय संघाने ३ मालिका जिंकल्या असून एक मालिका ही बरोबरीत सुटली होती. भारतीय संघाने जी एकमेव मालिका गमावली त्या मालिकेत फक्त एकच सामना खेळवण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात भारतीय संगाने एकूण ९ सामन्यात ६ विजय तर ३ पराभव असा रेकॉर्ड आहे.