आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी २०२४ ते २०३१ या कालावधीतील ८ मुख्य स्पर्धांच्या आयोजनाचा मान १४ देशांना दिला. आयसीसीच्या या घोषणेत सर्वाधिक लक्ष वेधले ते पाकिस्तानला मिळालेल्या यजमानपदाचे... पाकिस्तानला २९ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा आयोजनाचा मान मिळाला आहे. १९९६मध्ये त्यांनी भारत व श्रीलंका यांच्यासह संयुक्तपणे वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानंतर आता २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तान भूषविणार आहे. पण, या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का, या प्रश्नाच्या उत्तराची शोधाशोध आतापासूनच सुरू झाली आहे. त्यात केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर ( Anurag Thakur) यांच्या विधानानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) अध्यक्ष रमीझ राजा ( Ramiz Raja) यांची प्रतिक्रिया आली.
अनुराग ठाकूर काय म्हणाले? केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर ( Anurag Thakur) यांच्याकडून महत्त्वाचे अपडेट्स मिळाले आहे. दोन्ही देशांमधील राजकिय संबंध ताणले गेल्यामुळे उभय संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. अनुराग ठाकूर यांनी सांगितले, वेळ आल्यावर त्यावर निर्णय घेतला जाईल. गृह मंत्रालयाचा या निर्णयात सहभाग असणार आहे. नुकतंच काही देशांनी सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यामुळे २०२५मध्ये सुरक्षेची तपासणी करून निर्णय घेतला जाईल.''
त्यावर रमीझ राजा यांचे उत्तर...
ते म्हणाले, आमच्या सुरक्षा तज्ज्ञांनी पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था ही इंग्लिश प्रीमिअर लीग व फॉर्म्युला १ पेक्षाही सरस असेल असे मला सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेणे सोपी गोस्ट नाही. त्यामुळे जेव्हा आयोजनाचा मान दिला गेला, तेव्हा दोन्ही देशांतील बोर्डाचा विचार केलाच असेल. त्यामुळे माझ्या मते, पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून भारत माघार घेणार नाही.''
''भारत-पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका होणे सध्यातरी शक्य नाही, परंतु तिरंगी मालिकेत दोन्ही संघांना खेळताना पाहण्याची अपेक्षा करतो,''असेही राजा यांनी सांगितले.