India Tour Of South Africa: भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. आफ्रिकेत दाखल झाल्यानंतर भारतीय संघानं पहिल्या दिवशी एकत्र सराव केला. यात वॉर्मअपसाठी टीम इंडियाचे खेळाडू फूटबॉल आणि वॉलीबॉल यांचा संगम असलेला फूटवॉली खेळ खेळताना दिसले. विशेष म्हणजे यात भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राहुल द्रविड विरुद्ध विराट कोहली अशा दोन संघांमध्ये मैत्रिपूर्ण वातावरणात फूटवॉलीचा खेळ रंगला होता. यात भारतीय संघाचे खेळाडू खेळासोबतच धमाल मस्ती करताना पाहायला मिळत आहेत.
द.आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये सध्या भारतीय क्रिकेट संघ असून १० तासांचा विमान प्रवास आणि त्यानंतर हॉटेलमध्ये कोरोना नियमांमुळे एकांतात वेळ व्यतित केल्यानंतर थकवा दूर करण्यासाठी आज सर्वांसाठी 'वॉर्मअप डे' ठेवण्यात आला होता. यात सकाळी सर्व खेळाडूंचं जॉगिंग सेशन झालं. त्यानंतर हॉटेलच्या परिसरातच फूटवॉलीच्या खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. बीसीसीआयनं याचा व्हिडिओ ट्विट केला असून खेळाडू धमाल करताना पाहायला मिळत आहेत. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील खेळाडूंसोबत त्याच ऊर्जेनं आणि स्फूर्तीनं खेळताना पाहायला मिळतो आहे.
भारताला कसोटी इतिहासात दक्षिण आफ्रिकेत ८ दौऱ्यांवर एकही मालिका जिंकता आलेली नाही. यंदाच्या ३ सामन्यांच्या मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.
भारताचा कसोटी संघ -विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाळ, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्वीन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज; राखीव - नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्झान नगवास्वाला
भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रकपहिली कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, दुपारी १.३० वाजल्यापासून, सेंच्युरियनदुसरी कसोटी - ३ ते ७ जानेवारी, २०२२, दुपारी १.३० वाजल्यापासून, जोहान्सबर्गतिसरी कसोटी - ११ ते १५ जानेवारी, २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन