India tour of South Africa: Hardik Pandya out of SA tour - कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटमुळे टीम इंडियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा अडचणीत सापडलेला असताना अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यानं या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेतून हार्दिकला डच्चू दिला गेला होता. तंदुरुस्तीच्या कारणावरून हार्दिक वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानही चर्चेत राहिला होता. त्यामुळे बीसीसीआयनं त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) जाऊन तंदुरुस्ती सिद्ध करण्यास सांगितले होते. त्यानंतरच त्याचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी विचार होणार होता. पण, आता हार्दिकनंच बीसीसीआयकडे आफ्रिका दौऱ्यावर जाणार नसल्याचे कळवले आहे.
InsideSportनं दिलेल्या वृत्तानुसार हार्दिकनं बीसीसीआयला विनंती करून तंदुरुस्तीसाठी अधिक वेळ मागितला आहे. ''दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याच्या नावाचा विचार करू नका, असे त्यानं बीसीसीआयला कळवले आहे. तो आता तंदुरुस्तीसाठी मेहनत घेत आहे आणि बीसीसीआय व NCAच्या पुनर्वसनाच्या नियमाचे पालन करणार आहे. त्यामुळे तो कधी पुनरागमन करेल, हे मी सांगू शकत नाही. आगामी वेस्ट इंडिज मालिकेत तो खेळेल, अशी आशा आहे, परंतु आता काहीच सांगणे अवघड आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.
हार्दिकचा फक्त फलंदाज म्हणून संघात समावेश करणे अवघडच आहे आणि त्यामुळे त्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ खेळायचा असेल तर अष्टपैलू म्हणून स्वतःला सिद्ध करावं लागेल, असेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. ''तो आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पूर्वी त्यानं अष्टपैलू खेळाडू म्हणून पुनरागमन करावं, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे त्यानं तंदुरुस्तीसाठी आणखी वेळ मागितल्याचा निर्णय योग्यच आहे. त्याच्यासाठी हे महत्त्वाचे आहे. आम्ही त्याला सर्वतोपरी मदत करू,''असेही त्यांनी स्पष्ट केलं.
या आठवड्यात हार्दिक NCA मध्ये दाखल होणे अपेक्षित होते, परंतु तो अद्यापही तेथे दाखल झालेला नाही.