India tour of South Africa: भारतीय संघात विराट कोहली vs रोहित शर्मा ( Virat Kohli vs Rohit Sharma) असा वाद सुरू झाल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. त्याला तसे निमित्तही मिळालं आहे. BCCI नं विराटकडून वन डे संघाचं कर्णधारपद काढून रोहितच्या खांद्यावर सोपवलं. विराटला बीसीसीआयनं ४८ तासांची मुदत दिल्याची चर्चा होती आणि त्यानंतर हा निर्णय घेतला गेला. या निर्णयाशी दुःखी झालेल्या विराटनं त्याचा फोन बंद केल्याची माहिती त्याच्या प्रशिक्षकांनी दिली. त्यात विराट भारतीय संघासोबतच्या सराव सत्रात सहभाग न घेता थेट क्वारंटाईनमध्ये दाखल झाला. आता त्यात भर म्हणून विराट दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील वन डे मालिकेत खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे.
सोमवारी रोहितनं दुखापतीमुळे आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेतून माघार घेतली. तो विराटच्या नेतृत्वाखालील कसोटी मालिकेत आफ्रिका दौऱ्यावर खेळणार नाही, तर आता विराटनं वन डे मालिकेतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे दोन्ही कर्णधार एकमेकांच्या नेतृत्वाखाली या दौऱ्यावर तरी खेळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे. TOIनं तसं वृत्त दिले आहे. जानेवारी महिन्यात क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याचे विराटनं BCCIला कळवले आहे. जानेवारीत विराटची कन्या वामिका हिचा पहिला वाढदिवस आहे आणि त्यामुळे त्यानं वन डे मालिकेतून विश्रांतीचा निर्णय BCCIला कळवला आहे.
रोहितनं हॅमस्ट्रींग दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी बराच कालावधी मिळतोय आणि तो वन डे मालिकेसाठी संघात परतणार आहे. रविवारी सराव सत्रात रोहितला दुखापत झाली. त्याच्याजागी बीसीसीसीआयनं प्रियांक पांचाळ याचा कसोटी संघात समावेश केला आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
- पहिली कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, दुपारी १.३० वाजल्यापासून, सेंच्युरियन
- दुसरी कसोटी - ३ ते ७ जानेवारी, २०२२, दुपारी १.३० वाजल्यापासून, जोहान्सबर्ग
- तिसरी कसोटी - ११ ते १५ जानेवारी, २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन
- पहिली वन डे - १९ जानेवारी २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, पार्ल
- दुसरी वन डे - २१ जानेवारी २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, पार्ल
- तिसरी वन डे - २३ जानेवारी २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन