India Tour to South Africa : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आता टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तीन कसोटी व तीन वन डे सामन्यांच्या या दौऱ्याला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. रोहित शर्मा, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत व मोहम्मद शमी आदी खेळाडूंचे पुनरागमन निश्चित आहे. पण, अजिंक्य रहाणेच्या स्थानाबद्दल बरीच चर्चा रंगताना दिसत आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ १८ सदस्यीय संघ पाठवण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंड दौऱ्यावर मयांक अग्रवाल व शुबमन गिल यांनी सलामीची जबाबदारी सांभाळली होती, परंतु रोहित व लोकेश यांच्या पुनरागमनानं गुंता वाढणार आहे. भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा ( Aakash Chopra) यानं या दौऱ्यासाठी कसोटी संघ निवडला आहे. त्यानं सलामीला रोहित व राहुल या जोडीला प्राधान्य दिले आहे. त्यानंतर चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांची अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर संधी दिली आहे. चोप्रानं त्याच्या संघात अजिंक्य रहाणेला स्थान दिलेले नाही, त्याच्या जागी पाचव्या क्रमांकावर त्यानं श्रेयस अय्यरची निवड केली आहे. कानपूर कसोटीत पदार्पणातच अय्यरनं शतकी खेळी केली होती.
रिषभ पंतच्या पुनरागमनानं वृद्धीमान सहाला पुन्हा बाकावर बसावे लागणार आहे, तर केएस भारत कमनशिबी ठरणार आहे. चोप्रानं सहाव्या क्रमांकावर रिषभची तर आर अश्विन व रवींद्र जडेजा या दोन फिरकीपटू-अष्टपैलू खेळाडूंची निवड केली आहे. जलदगती माऱ्याची जबाबदारी त्यानं मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांच्याकडे सोपवली आहे.
आकाश चोप्राचा कसोटी संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, शार्दूल ठाकूर, उमेश यादव