नवी दिल्ली : स्नायूदुखीमुळे त्रस्त असलेला रोहित शर्मा याच्याऐवजी भारताच्या द. आफ्रिका दौऱ्यात अनुभवी सलामीवीर लोकेश राहुल हा कसोटी संघाचा उपकर्णधार असेल. २८ डिसेंबरपासून मालिकेला सुरुवात होत आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली.
राहुल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. तीनही प्रकारात त्याने स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याचे कसोटी संघात पुनरागमन झाले होते. त्याने आठ डावात ३१५ धावा केल्या. त्याआधी २०१४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात राहुलचे कसोटी पदार्पण झाले होते. आतापर्यंतच्या ४० कसोटीत त्याने २,३२१ धावा केल्या असून ६८ डावात त्याची सहा शतके आणि १२ अर्धशतके आहेत.
रोहित हॅमस्ट्रिंगने त्रस्त
द. आफ्रिका दौऱ्यासाठी रोहितला अजिंक्य रहाणेच्या जागी कसोटी संघाचा उपकर्णधार बनविण्यात आले होते. दौऱ्यावर रवाना होण्याआधीच सराव सत्रादरम्यान त्याच्या डाव्या पायाला हॅमस्ट्रिंग झाले. त्यामुळे या मालिकेतूनच त्याला बाहेर पडावे लागले. जखमेतून सावरण्यासाठी रोहित सध्या एनसीएत सहभागी झाला आहे. रोहितऐवजी प्रियांक पांचाळ याला संघात स्थान देण्यात आले.