India Tour To South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीची घोषणा लांबणीवर पडताना दिसत आहे. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा या सीनियर खेळाडूंच्या निवडीवरून बरीच चर्चा सुरू असताना बीसीसीआयची डोकेदुखी आणखी वाढली आहे. भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ निवडताना या गोष्टीनं निवड समितीची चिंत वाढवली आहे. Indian Express नं दिलेल्या वृत्तानुसार अष्टपैलू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याच्यासह चार खेळाडूंना दुखापतीनं ग्रासले आहे. त्यामुळे त्यांचे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणे अवघड आहे. त्यांना तंदुरुस्त होण्यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.
डावखुरे फिरकीपटू हे भारतीय संघाची ताकद आहे, विशेष करून घरच्या मैदानावर, परंतु जडेजा व अक्षर पटेल अनफिट आहेत आणि निवड समितीकडे त्यांच्यासाठी बॅकअप पर्याय नाहीत. आर अश्विनला फिरकीपटूंचे नेतृत्व करावे लागेल, परंतु त्याला सोबतीला कोण असेल हे सांगणे अवघड आहे. जडेजाला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दुखापतीमुळे मुकावे लागले होते. जर त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करावी लागल्यास तो आयपीएलसाठीच फिट होऊ शकतो. शुबमन गिल व इशांत शर्मा यांनाही दुखापतीमुळे आफ्रिका दौऱ्याला मुकावे लागू शकते.
अक्षर पटेलला आफ्रिका दौऱ्यावर पाठवायचे की नाही याचा निर्णय वैद्यकिय तज्ज्ञाच्या सल्ल्यानंतर घेतला जाईल. शाहबाज नदीम व सौरभ कुमार या पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत गिलला दुखापत झाली होती. त्यानं फलंदाजी केली, परंतु क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानावर उतरला नाही. आफ्रिका दौऱ्यासाठी रोहित शर्मा व लोकेश राहुल यांचे पुनरागमन होणार असल्यानं सलामीला या दोघांचाच विचार केला जाईल. मयांक अग्रवाल राखीव सलामीवीर म्हणून संघासोबत जाईल. इशांत शर्मा तंदुरुस्त नसल्यास मोहम्द सिराजला संधी मिळू शकते.
भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
- पहिली कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, दुपारी १.३० वाजल्यापासून, सेंच्युरियन
- दुसरी कसोटी - ३ ते ७ जानेवारी, २०२२, दुपारी १.३० वाजल्यापासून, जोहान्सबर्ग
- तिसरी कसोटी - ११ ते १५ जानेवारी, २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन