Rohit Sharma BCCI interview: भारताच्या वन डे संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) यानं रविवारी BCCIला मुलाखत दिली. यावेळी त्यानं माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यासोबतच्या कथित वादावर एका वाक्यात उत्तर दिलं. भारतीय संघाचे नेतृत्व करणे हे खूप आव्हानात्मक काम आहे आणि त्यामुळे मला दिलेल्या जबाबदारीवर लक्ष केंद्रीत करणे, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. असे मत त्यानं व्यक्त केलं.
आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी रोहित शर्मानं त्याच्या जबाबदारीबद्दल मोकळेपणानं मत व्यक्त केले. यावेळी त्यानं खेळाडूंना एक मोलाचा सल्लाही दिला. BCCI.TV ला दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्मानं स्पष्ट मत व्यक्त केले. तो म्हणाला,''भारताकडून क्रिकेट खेळताना मनावर दडपण असतंच... लोकं बरंच काही बोलत असतात मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक.. पण एक क्रिकेटपटू म्हणून, मी कर्णधार म्हणून नाही बोलत, तर खेळाडू म्हणून आपल्या कामावर लक्ष केंद्रीत ठेवणे हे ध्येय असायला हवं. लोक काय बोलतात त्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं. त्यांच्या बोलण्यावर तुम्ही ताबा ठेवू शकत नाही. हे मी लाखोवेळा बोललो आहे.''
''मी संघातील प्रत्येक खेळाडूलाही हाच संदेश देऊ इच्छितो. महत्त्वाच्या स्पर्धेदरम्यान बोलणारी अनेक लोकं असतात, पण जे आपल्या हातात आहे त्यावरच लक्ष केंद्रीत करायला हवं. तुम्ही जो खेळ करत आलाय, तोच खेळ कायम राखायला हवा. त्यामुळे मैदानाबाहेर काय चर्चा सुरूय यापेक्षा आपण एकमेकांबद्दल काय विचार करतो हे महत्त्वाचे आहे. राहुल भाई हेच वातावरण संघात कायम राखण्याचा प्रयत्न करत आहेत,''असेही रोहित म्हणाला.
''विराट कोहलीनं या संघाला उंचीवर आणले आहे की जिथून मागे वळून पाहायला नको. मागील पाच वर्ष त्यानं फ्रंटवर राहुन भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. त्याचा एकच स्पष्ट ध्येय व दृढनिश्चय होता, तो म्हणजे प्रत्येक सामना जिंकायचा आणि संपूर्ण संघालाही त्यानं तोच संदेश दिला होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळतानाचे क्षण सुंदर होते. त्याच्या कर्णधारपदाखाली मी बरंच क्रिकेट खेळलो आहे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला आहे. पुढेही मी हेच कायम ठेवणार आहे,''असेही रोहित म्हणाला.
वन डे संघाचा कर्णधार म्हणून रोहितनं १० सामन्यांत ७७.५७च्या सरासरीनं ५४३ धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकांचा समावेश आहे. नाबाद २०८ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतानं १०पैकी ८ सामने जिंकले आहेत. तो म्हणाला,''मला जेवढी संधी मिळाली, ते मी माझं भाग्य समजतो. ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला त्याचा आनंद आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी मी तयार आहे. हा प्रवास रंजक होणार आहे. मला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी एक गोष्ट कायम ठेवली ती म्हणजे खेळाडूंशी स्पष्ट संवाद, प्रत्येकाला त्याची जबाबदारी नीट कळावी याची काळजी घेतली.''