India Tour to South Africa : न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राहुल द्रविडचा टीमसोबतचा पहिलाच परदेश दौरा असणार आहे. पण, या दौऱ्यासाठी संघ निवडताना निवड समिती डोकेदुखी वाढणार असल्याचे द्रविडनं स्पष्ट केलं. कारण, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मिळालेल्या संधीचं युवा खेळाडूंनी सोनं केलं. त्यामुळे फॉर्माशी झगडणाऱ्या अजिंक्य रहाणेचं ( Ajinkya Rahane) संघातील स्थान डळमळीत होतंय की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी त्याला झालेल्या दुखापतीवरही शंका उपस्थित करण्यात आली. त्यात विराट कोहलीनं ( Virat Kohli) दुसऱ्या कसोटीनंतर दिलेल्या वक्तव्यानं सारेच चक्रावले आहेत.
अजिंक्य रहाणेची कामगिरी ही सध्या संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. ३४ वर्षीय अजिंक्य सातत्यानं अपयशी ठरतोय. मागील १६ कसोटीत त्याला एकच शतक झळकावता आले आहे आणि त्याची सरासरी ५१.३७ वरून ३९.६० अशी घसरली आहे. २०२०त त्यानं ४ कसोटीत ३८.८६च्या सरासरीनं २७२ धावा केल्या, तर २०२१मध्ये १२ कसोटीत २०.३५च्या सरासरीनं ४०७ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्यानं दोन डावांत अनुक्रमे ३५ व ४ धावाच केल्या. त्यामुळे त्याची दक्षिण आफ्रिके दौऱ्यासाठी निवड होईल का?, यावर विराटनं चतुराईनं उत्तर दिलं.
कोहलीनं कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्यचा बचाव केला. तो म्हणाला,''मी अजिंक्यच्या फॉर्मला जज करू शकत नाही. मला असं वाटतं ते कुणीच जज करू शकत नाही. त्या व्यक्तिलाच या प्रश्नाचे उत्तर माहीत असते की आपण कुठे चुकतोय. पण, कसोटी क्रिकेटमध्ये संघ संकटात असताना अनेकदा ज्या खेळाडूंनी उल्लेखनीय खेळ केलाय, अशांचा पाठिशी उभं राहायला हवं.''
कानपूर कसोटीत पदार्पणाची संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरनं पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले आणि त्यामुळे अजिंक्यच्या जागी त्याला संधी मिळावी अशी चर्चा सुरू आहे. पण, बाहेच्यांचं ऐकून निर्णय घेतला जाणार नाही, असे कोहलीचे मत आहे.
तो म्हणाला,''जर एखाद्या खेळाडूविरोधात वातावरण निर्माण केलं जात असेल आणि त्या खेळाडूवर दडपण निर्माण करून, पुढे काय होईल?, असा सवाल केला जात असेल, तर अशा लोकांचं आम्ही मनोरंजन करणार नाही. हिच लोकं दोन महिन्यानंतर त्याच खेळाडूचं कौतुक करतील ज्याला ते आता बाहेर करा असे म्हणत आहेत. त्यामुळे बाहेरील आवाज न ऐकणेच गरजेचे आहे. आम्ही खेळाडूच्या नेहमी पाठिशी उभं राहु, मग तो अजिंक्य असो किंवा दुसरा कोणीही.''
Web Title: India Tour to South Africa : Virat Kohli gives sharp response on questions about Ajinkya Rahane's form
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.