India Tour of South Africa: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करणे खरंच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार विराट कोहली व निवड समितीसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. मंगळवारी दुपारी २ वाजता सुरू झालेल्या बैठकीमुळे संघाची घोषणा होईल, असे वाटत होते. पण, ७-८ तासांच्या बैठकीनंतरही बीसीसीआयकडून घोषणा झाली नाही. त्यामुळे आज दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीचा संघ जाहीर केला जाणे अपेक्षित आहे. या बैठकीत अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) अन्य सीनियर खेळाडूंच्या भविष्याबाबत बरीच चर्चा झाली. युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे अपयशी ठरणाऱ्या सीनियर खेळाडूंना धोक्याचा इशारा मिळत आहे. त्यामुळे आफ्रिका दौऱ्यासाठी निवडणाऱ्या संघात सीनियर खेळाडू की युवा खेळाडू हा पेच निवड समितीसमोर होता. सूत्रांच्या माहितीनुसार निवड समितीनं दक्षिण आफ्रिकेच्या खडतर दौऱ्यासाठी सीनियर खेळाडूंनाच प्राधान्य दिलं आहे, परंतु ही त्यांच्यासाठी शेवटची संधी असेल, हेही स्पष्ट करण्यात आलं आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं ( CSA) सोमवारी भारताविरुद्धच्या मालिकेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार भारतीय संघ तीन कसोटी व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार असून २६ डिसेंबरपासून दौऱ्याला सुरुवात होणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार हा दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होणार होता, परंतु बीसीसीआयनं ओमायक्रॉनच्या संकटामुळे या दौऱ्यातील चार ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका स्थगित केली. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे व इशांत शर्मा यांचा फॉर्म हा संघासाठी चर्चेचा विषय होता. पण, या अनुभवी खेळाडूंना आफ्रिकेच्या खडतर दौऱ्यावर संधी द्यायला हवी, असं एकमत झाल्याचं कळतंय.
''दक्षिण आफ्रिका हा आव्हानात्मक दौरा आहे. तेथे आम्ही कसोटी मालिकेत त्यांना पराभूत करू शकलेलो नाही. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंवर संघाला विश्वास आहे. ते फॉर्मात परततील, असा सर्वांना आत्मविश्वास आहे आणि आफ्रिकेला त्यांच्याच घरी नमवण्यात हे अनुभवी खेळाडू हातभार लावतील,''असे मत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं व्यक्त केलं. अजिंक्य रहाणेनं २०१३ व २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ३ कसोटीत ५३च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. पुजारानं ७ कसोटी सामन्यांत ३१च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. इशांत शर्मानंही ७ कसोटींत २० विकेट्स घेतल्या आहेत.
कालच्या बैठकीत चर्चेत आलेले महत्त्वाचे मुद्दे
- आज होणार कसोटी संघाची घोषणा
- २० सदस्यीय कसोटी संघ, अजिंक्य रहाणेकडे उप कर्णधारपद कायम
- हनुमा विहारीचा २० सदस्यीय संघात समावेश. विहारी भारत अ संघासोबत आफ्रिका दौऱ्यावर आहे आणि त्यानं सर्वाधिक २००+ धावा केल्या आहेत.
- वन डे मालिकेसाठी संघाची घोषणा नंतर, विराट कोहलीच वन डे संघाच्या कर्णधारपदावर कायम राहणार
भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
- पहिली कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, दुपारी १.३० वाजल्यापासून, सेंच्युरियन
- दुसरी कसोटी - ३ ते ७ जानेवारी, २०२२, दुपारी १.३० वाजल्यापासून, जोहान्सबर्ग
- तिसरी कसोटी - ११ ते १५ जानेवारी, २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन