India Tour to Sri Lanka : chetan sakaria - स्वप्नांना मेहनतीची जोड दिली की लक्ष्य साध्य होतंच... काहीसं असंच चेतन सकारियासोबत घडलं आहे. टीम इंडिया जुलै महिन्यात 3 वन डे व 3 ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी गुरुवारी बीसीसीआयनं टीम इंडियाची घोषणा केली आणि त्यात चेतन सकारियानं स्थान पटकावलं. सौराष्ट्रच्या या गोलंदाजानं याचवर्षी इंडियन प्रीमिअर लीगमध्येही पदार्पण केलं आणि अनेक दिग्गज खेळाडूंना पेव्हेलियनचा रस्ता दाखवून त्यानं निवड समितीचं लक्ष वेधलं. त्यानं 7 सामन्यांत 7 विकेट्स घेतल्या, परंतु कठीण प्रसंगी त्यानं जिगरबाज गोलंदाजी करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. याच निडर कामगिरीमुळे त्याची लंका दौऱ्यासाठी निवड झाली. विराट कोहली, महेंद्रसिंग धोनीच्या संघातील ओपनर टीम इंडियाकडून खेळणार; पाच नवीन चेहरे संधीचं सोनं करणार!
पाच महिन्यांत चेतन सकारियावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या लहान भावानं राहत्या घरी आत्महत्या केली, तर मागील महिन्यात कोरोनामुळे वडिलांचे निधन झाले. या परिस्थितीत चेतन डगमगला नाही आणि खंबीरपणे कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. चेतनच्या भावानं जानेवारी महिन्यात घरी आत्महत्या केली, त्यावेळी चेतन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळत होता. त्याला घरच्यांनी भावाच्या निधनाची बातमी कळू दिली नव्हती. भावाच्या निधनाच्या पाच महिन्यानंतर चेतननं वडिलांचे छत्रही गमावलं. आयपीएल 2021त खेळत असताना चेतनच्या वडिलांना कोरोना झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. आयपीएल स्थगित झाल्यानंतर चेतन घरी परतला, परंतु तो वडिलांना वाचवू शकला नाही.
चेतन सकारियानं 23 ट्वेंटी-20 सामन्यांत 35 विकेट्स घेतले. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 7 सामन्यांत 10 आणि 15 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 41 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय संघ - शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीया. नेट बॉलर्स - इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग