U-19 World Cup 2022 : भारतीय युवा संघानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सुरुवात केली. भारतीय संघानं पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ८२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. कर्णधार यश धुल ( Yash Dhull) आणि पुणेकर विकी ओस्तवाल ( Vicky Otswal) व राज बावा ( Raj Bawa) यांच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतानं हा विजय मिळवला. भारतानं विजयासाठी ठेवलेल्या २३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेला १८७ धावाच करता आल्या. ओस्तवाल व बावा यांनी मिळून ९ विकेट्स घेतल्या. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाच विकेटद्स घेणारा विकी ओस्तवाल हा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला. ( Vicky Ostwal is the first-bowler from India to take five-wicket haul in U-19 World Cup 2022)
प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. अंग्रीश रधुवंशी ( ५) व हेर्नूर सिंग ( १) हे सलामीवीर धावफलकावर ११ धावा असताना माघारी परतले. शेक रशीद व धुल यांनी भारताचा डाव सावरताना तिसऱ्या विकेटसाठी ७०+ धावा जोडल्या. रशीद ३१ धावांवर माघारी परतला. निशांत संधू ( २७) व कौशल तांबे ( ३५) यांनी कर्णधार धुलला साथ दिली. पण, अन्य फलंदाजांनी निराश केलं. धुलनं १०० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीनं ८२ धावा केल्या. त्याला धावबाद होऊन माघारी जावं लागलं. भारताचा डाव ४६.५ षटकांत २३२ धावांवर गडगडला. मॅथ्यू बोस्टनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात आफ्रिकेचा सलामवीर एथन-जॉन हा भोपळा न फोडताच माघारी परतला. व्हलेंटाईन किटीम ( २५), डेवाल्ड ब्रेव्हीस ( ६५) आणि कर्णधार जॉर्ज व्हॅन डिर्डन ( ३६) वगळता आफ्रिकेच्या फलंदाजांना तग धरता आला नाही. विकी ओस्तवालनं २८ धावांत ५ विकेट्स घेतल्या, तर राज बावानं ४७ धावांत ४ विकेट्स घेतल्या. राजवर्धन हंगार्गेकरनं एक विकेट घेतली. आफ्रिकेचा संघ ४५.४ षटकांत १८७ धावांत माघारी परतला.
कोण आहे विकी ओस्तवाल?विकी ओस्तवाल पुण्याचा आहे. आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये त्यानं ८ षटकांत ११ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. विनू मंकड करंडक स्पर्धेत विकीने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले होते. त्याने २९१ धावा केल्या आणि ११ विकेट्स घेतल्या.