लंडन : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला अजूनही सुरुवात व्हायची आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री वैतागले आहेत आणि त्याला कारण ठरली आहे एक खेळपट्टी.
भारताचा इसेक्स संघाबरोबर चार दिवसांच सराव सामना खेळण्यात येणार होता. त्यासाठी भारताने सरावही सुरु केला. पण संध्याकाळी शास्त्री यांनी खेळपट्टी पाहिली आणि खेळपट्टीवर असलेले गवत पाहून त्यांचा पारा चांगलाच चढला. जोपर्यंत खेळपट्टीवरचे गवत काढले जात नाही तोपर्यंत आम्ही खेळणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळेच चार दिवसांचा हा सराव सामना तीन दिवसांचा करण्यात आला आहे.
शास्त्री यांनी संध्याकाळी खेळपट्टीची पाहणी केली आणि त्यांचा पारा चढला. खेळपट्टीवरील गवताबाबत त्यांनी भाष्य केलं. त्याचबरोबर मैदान हे खेळण्यास योग्य नाही, खेळाडूंना दुखापत होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. पण शास्त्री यांना या साऱ्या गोष्टी खेळपट्टीवर पाहिल्यावर आठवल्या. जर मैदान खेळण्यास योग्य नव्हते तर जेव्हा भारतीय संघ दुपारी सराव करत होता तेव्हाही त्यांना सांगता आले असते. पण खेळपट्टीवरील गवत पाहून शास्त्री यांनी न खेळण्याचा पवित्रा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
एका वृत्तसेवेच्या प्रतिनिधीने यावेळी ग्राऊंडमन्सशी चर्चा केली. त्यावेळी भारतीय संघ व्यवस्थापनाने खेळपट्टीवरील गवत काढण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले आहे.