India vs Afghanistan 1st T20I Marathi Update ( Marathi News ) : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १४ महिन्यानंतर ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने चांगला खेळ केला. अक्षर पटेलच्या २ व शिवम दुबेच्या १ विकेटने अफगाणिस्तानला बॅकफूटवर फेकलेले. पण, अनुभवी फलंदाज मोहम्मद नबी व अझमतुल्लाह उमरजाई जोडी मैदानावर उभी राहिली आणि मजबूत धावसंख्या उभारली. अक्षर पटेल व मुकेश कुमार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेऊन धावगतीला वेसण घातली.
प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानला रहमनुल्लाह गुरबाज ( २३) व कर्णधार इब्राहिम जादरान ( २५) यांनी अर्धशतकी भागीदारी करून दिली. पण, अक्षर पटेलच्या षटकाने मॅच फिरली पटेलने आठव्या षटकात गुरबाज यष्टिचीत केले. रोहितने लगेच गोलंदाजीत बदल केला आणि शिवमने त्याच्या पहिल्या षटकात इब्राहिम जादरानला ( २५) रोहितकरवी झेलबाद केले. अक्षरने आणखी एक धक्का देताना पदार्पणवीर रहमत शाहचा ( ६) त्रिफळा उडवला. बिनबाद ५० वरून त्यांचे ३ फलंदाज ७ धावांवर माघारी परतले. १२व्या षटकात अझमतुल्लाह उमरजाईचा झेल उडाला होता आणि तो टिपण्यासाठी रोहितचा अफलातून प्रयत्न अपयशी ठरला.
पण, या तीन विकेटनंतर अफगाणिस्तानचा डाव मोहम्मद नबी व अझमतुल्लाह या जोडीने सावरला. या दोघांनी दमदार फटकेबाजी करताना संघाला १५ षटकात ३ बाद १०५ धावांवरपर्यंत पोहोचवले. या दोघांनी १५ व १६व्या षटकात अनुक्रमे १६ व १५ धावा कुटल्या. नबीने १६व्या षटकात मुकेश कुमारला लगावलेले दोन षटकार पाहण्यासारखे होते. या दोघांनी ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. १८व्या षटकात मुकेशने ४३ चेंडूंत ६८ धावा करणारी भागीदारी तोडली. उमरजाई ( २९) त्रिफळाचीत झाला. मुकेशने त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूंवर नबीची विकेट घेतली. २७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारासह ४२ धावा करणाऱ्या नबीचा झेल रिंकू सिंगने टिपला. या दोन विकेटनंतर अफगाणिस्तानच्या धावांचा ओघ मंदावला अन् त्यांना २० षटकांत ५ बाद १५८ धावा करता आल्या. अर्शदीपने टाकलेल्या २० व्या षटकात १६ धावा आल्या.
Web Title: India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : Axar Patel ( 2-23) & Mukesh Kumar ( 2-33); India need 159 to win the 1st T20i against Afghanistan.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.