India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : भारतीय गोलंदाजांनी त्यांची कामगिरी पहिल्या १० षटकांत चोख बजावली होती. अक्षर पटेलच्या २ व शिवम दुबेच्या १ विकेटने अफगाणिस्तानला बॅकफूटवर फेकलेले. पण, अनुभवी फलंदाज मोहम्मद नबी व अझमतुल्लाह उमरजाई जोडी मैदानावर उभी राहिली आणि मजबूत धावसंख्या उभारून दिली. प्रत्युत्तरात, भारताला दुसऱ्याच षटकात धक्का बसला अन् कर्णधार रोहित शर्मा खवळला.
१४ महिन्यानंतर ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या रोहितच्या फलंदाजीची सर्वांना उत्सुकता होती. त्याने दुसराच चेंडू मिड ऑफच्या दिशेने मारला.. नॉन स्ट्राईकवर उभा असलेला शुबमन गिल चेंडूकडे पाहत बसला, तोपर्यंत रोहित क्रिज सोडून बराच पुढे आला होता. जादरानने चेंडू लगेच यष्टिरक्षक रहमनुल्लाहकडे फेकला अन् रोहित शुन्यावर रन आऊट झाला. जाता जाता रोहित प्रचंड संतापलेला दिसला आणि तो शुबमनला मैदानावर खडे बोल सुनावताना दिसला. रोहित ५२ डावात पाचव्यांदा ट्वेंटी-२०त शून्यावर बाद झाला. भारताचे अन्य कर्णधार १४७ डावांत केवळ ४ वेळा शून्यावर बाद झाले आहेत.