साऊदॅम्पनट, आयसीसी वर्ल्ड कप 2019 भारत वि. अफगाणिस्तान : भारतीय संघाचे सलामीवर अपयशी ठरले की कोणतं संकट ओढावू शकते, याची प्रचिती कालच्या सामन्यात आली. विराट कोहली व केदार जाधव वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. मधल्या फळीत विजय शंकर आणि महेंद्रसिंग धोनी यांनी निराश केले. अफगाणिस्तानसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध भारताला केवळ 224 धावाच करता आल्या. गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोख बजावल्यानं भारताचा पराभव टळला. मोहम्मद शमीनं अखेरच्या षटकात हॅटट्रिक नोंदवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
मधल्याफळीत धोनी व जाधव यांनी 57 धावांची भागीदारी केली, परंतु धावांचा वेग फारच संथ होता. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही धोनी व जाधवच्या संथ भागीदारीवर नाराजी प्रकट केली. तो म्हणाला,''मी निराश झालो, यापेक्षा चांगली खेळी करता आली असती. धोनी व जाधव यांच्या भागीदारीवर मी असमाधानी आहे. ती अत्यंत संथ भागीदारी होती. आम्ही फिरकीपटूंच्या 34 षटकांत केवळ 119 धावाच करू शकलो. याचा गांभीर्यानं विचार होण्याची आवश्यकता आहे.''
तो पुढे म्हणाला,''प्रत्येक षटकात 2-3 निर्धाव चेंडू खेळले गेले. 38व्या षटकात विराट कोहली माघारी परतल्यानंतर 45व्या षटकापर्यंत आपण अधिक धावा केल्याच नाहीत. मधल्या फळीकडून आतापर्यंत अपेक्षित योगदान मिळालेले नाही आणि त्यामुळे अन्य फलंदाजांवर दडपण येत आहे.''
मोहम्मद शमीनं मानले जसप्रीत बुमराहचे आभार; पाहा व्हिडीओअफगाणिस्तानला अखेरच्या तीन षटकांत विजयासाठी 24 धावांची गरज होती. शमीनं 48व्या षटकात 3, तर बुमराहनं 49व्या षटकात 5 धावा दिल्या. त्यामुळे अफगाणिस्तानसमोर 6 चेंडूंत 16 धावांच आव्हान राहिलं. बुमराहनं केलेल्या टिच्चून माऱ्याबद्दल शमीनं त्याचे आभार मानले. तो म्हणाला,'' अखेरची तीन षटकात आम्ही टिच्चून मारा केला. जसप्रीत बुमराहनं 49व्या षटकात कमी धावा दिल्या आणि त्यामुळे अखेरच्या षटकात मला 16 धावा करण्यापासून अफगाणिस्तानला रोखायचं होतं. बुमराहनं माझं काम सोपं केलं. त्याच्या प्रभावी गोलंदाजीमुळे माझ्यावरील दडपण कमी झालं. मी विजय मिळवून देऊ शकतो, हा आत्मविश्वास निर्माण झाला.''