साऊदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. अफगाणिस्तान : रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या सलामीवीरांना झटपट माघारी पाठवून अफगाणिस्तानने टीम इंडियाला कोंडीत पकडले. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करून संघाला या गुंत्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतकाचे शतकात रुपांतर करता आले नाही. विजय शंकरला आज मोठी खेळी करून आपले स्थान पक्कं करण्याची संधी होती, परंतु तोही अपयशी ठरला. महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी विकेट टिकवली, परंतु त्यांच्या धावांच्या गतीचा वेग संथ होता. केदार जाधवने अर्धशतकी मजल मारली, त्याने ५२ धावा केल्या. त्यामुळे भारताला 224 धावांपर्यंतच मजल मारता आली.
रोहित शर्मानं मिळवला नकोसा मान; अफगाणिस्तानच्या फिरकीची कमाल
वर्ल्ड कप स्पर्धेच्या तीन सामन्यांत दोन शतके आणि एक अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयश आले. मुजीब उर रहमानच्या कॅरम बॉलवर रोहितचा त्रिफळा उडाला. डावाच्या पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रहमानने अप्रतिम चेंडू टाकून रोहितला अवघ्या एका धावेवर माघारी पाठवले. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकीपटूंना भारतीय फलंदाजांना बाद करता आलेले नाही, परंतु अफगाणिस्तानच्या रहमानने ती कामगिरी करून दाखवली. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये फिरकीपटूकडून बाद होणारा रोहित हा पहिला भारतीय ठरला आहे.
विराट कोहलीची 27 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी
हिटमॅन रोहित शर्मानं अफगाणिस्तानविरुद्ध नकोसा विक्रम नोंदवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं दमदार खेळी केली. त्याने या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा संयमाने सामना करताना अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले. त्याने ऑस्ट्रेलिया ( 82) आणि पाकिस्तान ( 77) यांच्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धही अर्धशतक झळकावले. कोहलीची ही खेळी विक्रमी ठरली. 27 वर्षांनंतर भारतीय कर्णधाराने प्रथमच सलग तीन सामन्यांत अर्धशतक करण्याचा पराक्रम केला. यापूर्वी 1992साली मोहम्मद अझरूद्दीनने सलग तीन अर्धशतकं झळकावली होती.
महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधवची अर्धशतकी भागीदारी
कोहली बाद झाल्यानंतर धोनी आणि जाधव यांनी बराच काळ खेळपट्टीवर नांगर रोवला होता. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण, यांच्या धावांची गती अत्यंत संथ होती. धोनीनं 52 चेंडूंत 28 धावा केल्या आणि त्यात केवळ तीन चौकरांचा समावेश होता. आदिल रशीदनं त्याला यष्टिचीत केले.
Web Title: India vs Afghanistan Latest: Afghanistan take control of India,
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.