साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. अफगाणिस्तान : साउदॅम्पटन येथील हॅम्पशायर बाऊल येथे आज भारत आणि अफगाणिस्तान हा सामना रंगणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आतापर्यंत अपराजीत राहिलेला आहे. चार सामन्यांत तीन विजय आणि एक अनिर्णीत निकालासह भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानला पाच सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. उपांत्य फेरीतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले असले तरी उर्वरित चार सामन्यांत प्रतिस्पर्धींना धक्का देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. अफगाणिस्तानला मागील सामन्यात इंग्लंडने 150 धावांनी पराभूत केले होते.
दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान यांच्या सामन्यावर हवामानाची कशी कृपा असेल ते पाहूया... अफगाणिस्तानचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघाला सराव सत्रावर पाणी फिरवावे लागले. हवामानाच्या लहरी स्वभावामुळे भारतीय संघाला सराव सत्र गुंडाळावे लागले. पण, शनिवारी येथे लख्ख सूर्यप्रकाश पडणार असून अधुनमधून ढगांची शर्यत पाहायला मिळेल. येथील तापमान 18-19 डिग्री सेल्सियस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यावर पावसाचे तुर्तास तरी सावट नाही.
खेळपट्टीचा अंदाजयेथे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी दोन्ही वेळेला बाजी मारलेली आहे. पण, आताची परिस्थिती वेगळी आहे. डोक्यावर सूर्यप्रकाश असल्याने फलंदाजांना फार मदत मिळणार आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज घेता नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजीला प्राधान्य देईल.
आकडे काय सांगतात ?वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघ प्रथमच एकमेकांसमोर येणार आहेत. यापूर्वी दोनवेळा वन डे क्रिकेटमध्ये भारत-अफगाणिस्तान समोरासमोर आले आणि भारताने एक सामना जिंकला, तर एक लढत अनिर्णीत राहिली. साऊदॅम्प्टन येथे 27 वन डे सामने खेळवले गेले आहेत आणि यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील हा तिसरा सामना असेल. येथे इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध केलेली 373 धावांची खेळी ही सर्वोत्तम आहे.
फलंदाजांना सरावाची संधी... अफगाणिस्तानविरुद्ध सर्वांची नजर भारतीय फलंदाजांवर असेल. रोहित शर्माने आपल्या लौकिकानुसार झंझावाती खेळी केली. मात्र कर्णधार कोहलीसह महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या यांना अपेक्षित खेळ करता आला नाही. त्यामुळे प्रमुख फलंदाजांना यावेळी छाप पाडण्याची संधी असेल.