साऊदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. अफगाणिस्तान : भारतीय संघाचे सलामीवर अपयशी ठरले की कोणतं संकट ओढावू शकते, याची प्रचिती कालच्या सामन्यात आली. अफगाणिस्तानसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध भारताला केवळ 224 धावाच करता आल्या. गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोख बजावल्यानं भारताचा पराभव टळला. मोहम्मद शमीनं अखेरच्या षटकात हॅटट्रिक नोंदवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेतन शर्मा ( 1987) यांच्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच भारतीय गोलंदाजाने हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला. या सामन्यानंतर जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहनं शमीची मुलाखत घेतली आणि त्यात शमींन बुमराहचे आभार मानले. का ते जाणून घेऊया...
रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या सलामीवीरांना झटपट माघारी पाठवून अफगाणिस्तानने टीम इंडियाला कोंडीत पकडले. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करून संघाला या गुंत्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतकाचे शतकात रुपांतर करता आले नाही. विजय शंकरला आज मोठी खेळी करून आपले स्थान पक्कं करण्याची संधी होती, परंतु तोही अपयशी ठरला. महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी विकेट टिकवली, परंतु त्यांच्या धावांच्या गतीचा वेग संथ होता. केदार जाधवने अर्धशतकी मजल मारली, त्याने ५२ धावा केल्या. त्यामुळे भारताला 224 धावांपर्यंतच मजल मारता आली.
प्रत्युत्तरात मोहम्मद नबीनं संयमी खेळ करताना अफगाणिस्तानला विजयानजीक आणलं होतं. पण, शमीनं अखेरच्या षटकात हॅटट्रिक घेत भारताचा विजय पक्का केला. अफगाणिस्तानला अखेरच्या तीन षटकांत विजयासाठी 24 धावांची गरज होती. शमीनं 48व्या षटकात 3, तर बुमराहनं 49व्या षटकात 5 धावा दिल्या. त्यामुळे अफगाणिस्तानसमोर 6 चेंडूंत 16 धावांच आव्हान राहिलं. बुमराहनं केलेल्या टिच्चून माऱ्याबद्दल शमीनं त्याचे आभार मानले. तो म्हणाला,'' अखेरची तीन षटकात आम्ही टिच्चून मारा केला. जसप्रीत बुमराहनं 49व्या षटकात कमी धावा दिल्या आणि त्यामुळे अखेरच्या षटकात मला 16 धावा करण्यापासून अफगाणिस्तानला रोखायचं होतं. बुमराहनं माझं काम सोपं केलं. त्याच्या प्रभावी गोलंदाजीमुळे माझ्यावरील दडपण कमी झालं. मी विजय मिळवून देऊ शकतो, हा आत्मविश्वास निर्माण झाला.''
'' वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक घेणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी देवाचे आभार मानतो. पण, यापुढे आपण दोघही मिळून ही कामगिरी करू, अशी आशा करतो. तेव्हाचा आनंद अधिक असेल,'' असेही शमी म्हणाला.
पाहा व्हिडीओ...
Web Title: India Vs Afghanistan Latest News, ICC World Cup 2019 : Mohammad Shami say thank's to Japrit bumrah, know why?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.