साऊदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019भारत वि. अफगाणिस्तान : जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला शनिवारी अफगाणिस्तान संघाने जमिनीवर आणले. जगातील सर्वोत्तम फलंदाजांची फौज असणाऱ्या भारतीय संघाला 224 धावाच करता आल्या. महेंद्रसिंग धोनीच्या संथ खेळीवर प्रचंड टीका झाली. अफगाणिस्तानने कडवी झुंज देत सामन्यात चुरस निर्माण केली होती. मोहम्मद नबीच्या विकेटने सामना भारताच्या बाजूनं झुकवला. मोहम्मद शमीनं अखेरच्या षटकात हॅटट्रिक नोंदवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयाचे श्रेय जसं शमीला जातं तसं धोनीही त्याचा भागीदार आहे.
नबीने पहिल्याच चेंडूवर चौकार मारल्यानंतर शमीकडे धाव घेत धोनीनं एक सल्ला दिला आणि त्यानंतर शमीनं इतिहास घडवला. चेतन शर्मा ( 1987) यांच्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. शमीनं या सामन्यात 40 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. धोनीनं असं काय सांगितलं, याबाबत शमीनंच खुलासा केला. तो म्हणाला,'' अखेरच्या षटकात अफगाणिस्तानला विजयासाठी 16 धावा हव्या होत्या. त्यामुळे यॉर्कर टाकण्याचाच प्लान होता आणि धोनीनंही मला तोच सल्ला दिला. तो म्हणाला, रणनीतीत काही बदल करू नकोस तुला हॅटट्रिक करण्याची संधी आहे. ही दुर्मिळ संधी असते आणि तुला ती मिळाली आहे. त्यामुळे त्याने जे सांगितले तेच मी केले.''
मोहम्मद शमीनं मानले जसप्रीत बुमराहचे आभार; पाहा व्हिडीओया सामन्यानंतर जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहनं शमीची मुलाखत घेतली आणि त्यात शमींन बुमराहचे आभार मानले. प्रत्युत्तरात मोहम्मद नबीनं संयमी खेळ करताना अफगाणिस्तानला विजयानजीक आणलं होतं. पण, शमीनं अखेरच्या षटकात हॅटट्रिक घेत भारताचा विजय पक्का केला. अफगाणिस्तानला अखेरच्या तीन षटकांत विजयासाठी 24 धावांची गरज होती. शमीनं 48व्या षटकात 3, तर बुमराहनं 49व्या षटकात 5 धावा दिल्या. त्यामुळे अफगाणिस्तानसमोर 6 चेंडूंत 16 धावांच आव्हान राहिलं. बुमराहनं केलेल्या टिच्चून माऱ्याबद्दल शमीनं त्याचे आभार मानले.
तो म्हणाला,'' अखेरची तीन षटकात आम्ही टिच्चून मारा केला. जसप्रीत बुमराहनं 49व्या षटकात कमी धावा दिल्या आणि त्यामुळे अखेरच्या षटकात मला 16 धावा करण्यापासून अफगाणिस्तानला रोखायचं होतं. बुमराहनं माझं काम सोपं केलं. त्याच्या प्रभावी गोलंदाजीमुळे माझ्यावरील दडपण कमी झालं. मी विजय मिळवून देऊ शकतो, हा आत्मविश्वास निर्माण झाला.''