साऊदॅम्पट, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. अफगाणिस्तान : भारतीय संघाने शनिवारी अफगाणिस्तानवर विजय मिळवत गुणतालिकेत आगेकूच केली. या विजयापेक्षा अफगाणिस्तान संघाच्या लढाऊ वृत्तीचेच अधिक कौतुक झाले. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर नियमभंगाची कारवाई झाली आहे. आयसीसी कलमाच्या पहिल्या स्तरावरील नियमाचे उल्लंघन केल्याप्रकणी कोहलीला दंड भरण्यास सांगण्यात आला आहे. त्याला त्याच्या मॅच फीमधील 25 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
विराटनं आयसीसीच्या 2.1 कलमाचे उल्लंघन केले आहे. या सामन्यात त्यानं पचांकडे वारंवार अपील केली आणि त्यामुळे त्याला हा दंड भरावा लागणार आहे. अफगाणिस्तानच्या डावातील 29व्या षटकात हा प्रकार घडला. पायचीतची अपील करताना विराट पंच अलीम दार यांच्याकडे आक्रमकपणे धावला. कोहलीनं ही चूक मान्य केली आहे.
विराट कोहलीची 27 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी
हिटमॅन रोहित शर्मानं अफगाणिस्तानविरुद्ध नकोसा विक्रम नोंदवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं दमदार खेळी केली. त्याने या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा संयमाने सामना करताना अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले. त्याने ऑस्ट्रेलिया ( 82) आणि पाकिस्तान ( 77) यांच्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धही अर्धशतक झळकावले. कोहलीची ही खेळी विक्रमी ठरली. 27 वर्षांनंतर भारतीय कर्णधाराने प्रथमच सलग तीन सामन्यांत अर्धशतक करण्याचा पराक्रम केला. यापूर्वी 1992साली मोहम्मद अझरूद्दीनने सलग तीन अर्धशतकं झळकावली होती.
महेंद्रसिंग धोनी-केदार जाधवच्या खेळीवर क्रिकेटचा देव नाराज; म्हणाला....
अफगाणिस्तानसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध भारताला केवळ 224 धावाच करता आल्या. गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोख बजावल्यानं भारताचा पराभव टळला. मोहम्मद शमीनं अखेरच्या षटकात हॅटट्रिक नोंदवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मधल्याफळीत धोनी व जाधव यांनी 57 धावांची भागीदारी केली, परंतु धावांचा वेग फारच संथ होता. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही धोनी व जाधवच्या संथ भागीदारीवर नाराजी प्रकट केली. तो म्हणाला,''मी निराश झालो, यापेक्षा चांगली खेळी करता आली असती. धोनी व जाधव यांच्या भागीदारीवर मी असमाधानी आहे. ती अत्यंत संथ भागीदारी होती. आम्ही फिरकीपटूंच्या 34 षटकांत केवळ 119 धावाच करू शकलो. याचा गांभीर्यानं विचार होण्याची आवश्यकता आहे.''
Web Title: India Vs Afghanistan Latest News, ICC World Cup 2019 : Virat Kohli found guilty of breaching The ICC Code of Conduct
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.