लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पहिल्यांदाच विश्वचषक खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यातील अखेरचे आणि निर्णायक षटक शमीने टाकले. या षटकामध्ये शमीने स्थिरस्थावर झालेल्या आणि भारताच्या विजयाच्या मार्गात अडसर निर्माण करणाऱ्या मोहम्मद नबीला बाद केले. नबीसह अजून दोन फलंदाजांना बाद करत हॅट्रिकही मिळवली. पण तरीही शमीला सामनावीराचा पुरस्कार मिळू शकला नाही. या सामन्यात सामनावीर ठरला तो जसप्रीत बुमरा. पण या सामन्यात बुमराने दोन विकेट्स मिळवल्या होत्या आणि शमीने चार, पण तरीही शमीला सामनावीर पुरस्कार का मिळाला नाही, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
विश्वचषकामध्ये आज अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भारताने अफगाणिस्तानवर 11 धावांनी मात केली. या लढतीत मोहम्मद शमीने भेदक मारा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यादरम्यान, डावातील शेवटच्या षटकात अफगाणिस्तानला विजयासाठी 16 धावांची गरज असताना शमीने शेवटच्या तीन फलंदाजांना तंबूची वाट दाखवत हॅट्ट्रिक नोंदवली. त्याने आपल्या शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे मोहम्मद नबी, अफताब आलम आणि मुजीब उर रहमान यांना त्रिफळाबाद केले.
भारताच्या २२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग अफगाणिस्तानचा संघ करत होता. अफगाणिस्तानचे रहमत शाह आणि हशमतुल्लाह शाहिदी हे दमदार फलंदाजी करत होते. त्यामुळे २८.३ षटकांमध्ये अफगाणिस्तानची २ बाद १०६ अशी स्थिती होती. यावेळी अफगाणिस्तानचा भारतापेक्षा वरचढ वाटत होता. त्यावेळी भारताला ही भागीदारी मोडीत काढायची होती. बुमराने २९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रहमत शाहला युजवेंद्र चहलकरवी झेलबाद केले. त्यानंतर या षटकाच्या सहाव्या चेंडूवर शाहिदीला बाद केले. स्थिरस्थावर झालेल्या या दोन्ही फलंदाजांना बुमराने एकाच षटकात बाद केले. त्यामुळे बुमराला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
क्रिकेट विश्वचषकामध्ये हॅटट्रिक नोंदवणारा शमी हा एकूण दहावा आणि भारताचा दुसरा गोलंदाज ठरला. याआधी चेतन शर्मा यांनी 1987 च्या विश्वचषकात हॅटट्रिक नोंदवली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून याआधी चेतन शर्मा, कपिल देव आणि कुलदीप यादव यांची हॅटट्रिक नोंदवली आहे.
जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला शनिवारी अफगाणिस्तान संघाने जमिनीवर आणले. जगातील सर्वोत्तम फलंदाजांची फौज असणाऱ्या भारतीय संघाला 224 धावाच करता आल्या. महेंद्रसिंग धोनीच्या संथ खेळीवर प्रचंड टीका झाली. अफगाणिस्तानने कडवी झुंज देत सामन्यात चुरस निर्माण केली होती. मोहम्मद नबीच्या विकेटने सामना भारताच्या बाजूनं झुकवला. मोहम्मद शमीनं अखेरच्या षटकात हॅटट्रिक नोंदवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयाचे श्रेय जसं शमीला जातं तसं धोनीही त्याचा भागीदार आहे.
नबीने पहिल्याच चेंडूवर चौकार मारल्यानंतर शमीकडे धाव घेत धोनीनं एक सल्ला दिला आणि त्यानंतर शमीनं इतिहास घडवला. चेतन शर्मा ( 1987) यांच्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. शमीनं या सामन्यात 40 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. धोनीनं असं काय सांगितलं, याबाबत शमीनंच खुलासा केला. तो म्हणाला,'' अखेरच्या षटकात अफगाणिस्तानला विजयासाठी 16 धावा हव्या होत्या. त्यामुळे यॉर्कर टाकण्याचाच प्लान होता आणि धोनीनंही मला तोच सल्ला दिला. तो म्हणाला, रणनीतीत काही बदल करू नकोस तुला हॅटट्रिक करण्याची संधी आहे. ही दुर्मिळ संधी असते आणि तुला ती मिळाली आहे. त्यामुळे त्याने जे सांगितले तेच मी केले.''