भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीअफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात शून्यावर बाद झाला असला तरी त्याने आपल्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाने सामन्याची दिशाच बदलली. सामन्यात विराट कोहलीचे क्षेत्ररक्षण सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरले. कारण विराटने अगदी मोक्याच्या क्षणी भारतीय संघासाठी काही महत्वाच्या धावा रोखल्या. एवढेच नाही, तर सुपर ओव्हरमध्ये त्याने एकाला धाव बाद करून भारतीय विजयाचा मार्गही प्रशस्त केला.
'सुपरमॅन' प्रमाणे हवेत जम्प मारून रोखल्या पाच धावा -
अफगाणिस्तानचा डाव सुरू असताना 17व्या षटकात विराट कोहलीने टीम इंडियासाठी 5 धावा वाचवल्या, कदाचित हाच सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर टीम इंडियासाठी हे षटक फेकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर करीम जन्नतने लाँग ऑनवर जबरदस्त फटका मारला. मात्र सीमारेषेवर असलेला विराट कोहलीने 'सुपरमॅन'प्रमाणे हवेत उडी मारत चेंडू रोखला. अफगाणिस्तानला 6 ऐवजी केवळ एकच धाव मिळाली.
अशा प्रकारे विराट कोहलीने जबरदस्त क्षेत्ररक्षण करून भारतीय संघासाठी महत्वाच्या क्षणी 5 धावा रोखल्या. जर विराटने या पाच धावा रोखल्या नसत्या तर कदाचित हा सामना टायही झाला नसता आणि अफगाणिस्तानला सहज विजय मिळाला असता. याशिवाय विराट कोहलीने 19व्या षटकात नजीबुल्लाह जादरानचा जबरदस्त झेलही घेतला. तसेच त्याने पहिल्या सुपर ओव्हरमध्ये तडाखेबाज फलंदाज गुलबदीन नईबला धावबादही केले. अशा पद्धतीने शून्यावर बाद होऊनही विराट कोहली क्षेत्ररक्षणामुळे आपल्या संघासाठी मॅच विनर ठरला.
सुपर ओव्हरचा थरार...
अफगाणिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीला आला आणि गुलबदीन नईब पहिल्याच चेंडूवर रन आऊट झाला. मोहम्मद नबी व गुरबाज नईम यांनी १६ धावा उभारल्या. भारताला विजयासाठी १७ धावांचे लक्ष्य दिले गेले. रोहित शर्माने पहिल्या चेंडूवर बाय धाव घेतली.. यशस्वी जैस्वालने एक धाव घेत रोहितला संधी दिली. त्यानंतर रोहितने दोन षटकार खेचले आणि मॅच २ चेंडूंत ३ धावा अशी आणली. पाचव्या चेंडूवर रोहितला एक धाव घेता आली. १ चेंडूंत २ धावा यशस्वीला करायच्या होत्या. रोहितने स्वतःला रिटायर्ट आऊट करताना रिंकू सिंगला पाठवले. पण, १ धाव आल्याने पुन्हा एक सुपर ओव्हर झाली.
दुसरी सुपर ओव्हर...
रोहित शर्माने ६,४,१ अशी सुरुवात करून दिली. रिंकू सिंग चौथ्या चेंडूवर झेलबाद झाला आणि संजू सॅमसन मैदानावर आला. पण, त्याचा फटका चूकला आणि रोहित धाव घेण्यासाठी पळाला. यष्टिरक्षकाने अचूक नेम साधून रोहितला ( ११) रन आऊट केले. दोन विकेट गेल्याने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी १२ धावांचे लक्ष्य राहिले. रवी बिश्नोईला हे षटक दिले गेले आणि त्याने पहिल्याच चेंडूवर मोहम्मद नबीला झेलबाद केले आणि बिश्नोईने तिसऱ्या षटकात गुरबाजची विकेट घेऊन भारताचा विजय पक्का केला.
Web Title: India vs Afghanistan t20 match Kohli became 'Superman' for the Indian team 5 runs saved by a fantastic jump; Watch the video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.