अबूधाबी : भारतीयांनी अखेर टी-२० विश्वचषक स्पर्धेत पहिला विजय मिळवताना अफगाणिस्तानचा ६६ धावांनी धुव्वा उडवला. मात्र, धावगती उंचावण्यात यश आल्यानंतरही भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा अजूनही धुसर आहेत. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत २ बाद २१० धावा कुटल्या. यावेळी धावगती न्यूझीलंड आणि अफगाण संघाहून अधिक करण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला ९९ धावांत रोखणे आवश्यक होते. मात्र त्यांनी २० षटकांत ७ बाद १४४ धावा केल्या.
आतापर्यंत अंतिम संघातून डावलण्यात आलेल्या रविचंद्रन अश्विनने आपली जादू दाखवताना ४ षटकांत केवळ १४ धावा देत २ खंदे फलंदाज बाद केले. मोहम्मद शमीने ३२ धावांत ३ बळी घेत भेदक मारा केला. करिम जनत (४२*) व कर्णधार मोहम्मद नबी (३५) यांनी अफगाणिस्तानकडून झुंज दिली. त्याआधी, लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी आक्रमण व संयम यांचा योग्य ताळमेळ साधत १४० धावांची सलामी दिली. स्टार गोलंदाज राशिद खानसह सर्वच गोलंदाज दोघांविरुद्ध अपयशी ठरल्याने अफगाण खेळाडू निराश झाले. रोहितने ४७ चेंडूंत ७४ धावा काढताना ८ चौकार व ३ षटकार मारले.
राहुलने ४८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६९ धावांचा चोप दिला. फटकेबाजीसाठी ॠषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांना बढती मिळाली. ही संधी साधत दोघांनी ६३ धावांची तुफानी भागीदारी केली. पंतने १३ चेंडूंत नाबाद २७ धावा कुटताना एक चौकार व ३ षटकार ठोकले. पांड्याने १३ चेंडूंत नाबाद ३५ धावा चोपत ४ चौकार व २ षटकार मारले. भारतीय संघाला आता आपल्या उर्वरीत दोन सामन्यांतही स्कॉटलंड आणि नामिबियाला मोठ्या अंतराने नमवावे लागेल.
धावफलक :भारत : लोकेश राहुल त्रि. गो. गुलबदिन नईब ६९, रोहित शर्मा झे. नबी गो. जनत ७४, ॠषभ पंत नाबाद २७, हार्दिक पांड्या नाबाद ३५. अवांतर - ५. एकूण : २० षटकांत २ बाद २१० धावा. बाद क्रम : १-१४०, २-१४७.गोलंदाजी : नबी १-०-७-०; अशरफ २-०-२५-०; नवीन ४-०-५९-०; हसन ४-०-३४-०; नईब ४-०-३९-१; राशिद ४-०-३६-०; करिम १-०-७-०. अफगाणिस्तान : हझरतुल्लाह झझई झे. ठाकूर गो. बुमराह १३, मोहम्मद शहझाद झे. अश्विन गो. शमी ०, रहमानुल्लाह गुरबाझ झे. हार्दिक गो. जडेजा १९, गुलबदिन नईब पायचीत गो. अश्विन ११, मोहम्मद नबी झे. जडेजा गो. शमी ३५, करिम जनत नाबाद ४२ , राशिद खान हार्दिक गो. शमी ०, शरफुद्दिन अशरफ नाबाद २. अवांतर - ४. एकूण : २० षटकांत ७ बाद १४४ धावा.बाद क्रम : १-१३, २-१३, ३-४८, ४-५९, ५-६९, ६-१२६, ७-१२७.गोलंदाजी : शमी ४-०-३२-३; बुमराह ४-०-२५-१; हार्दिक २-०-२३-०; जडेजा ३-०-१९-१; अश्विन ४-०-१४-२; ठाकूर ३-०-३१-०.
महत्त्वाचे :n स्पर्धेत विराट कोहलीने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक गमावली.n जुलै २०१७ नंतर (६५ सामन्यांनंतर) रविचंद्रन अश्विन पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला. n स्पर्धा इतिहासात भारताची दुसरी सर्वोत्तम धावसंख्या. n प्रथम फलंदाजी करताना २०० हून अधिक धावा केल्यानंतर भारत नेहमी विजयी.