अबुधाबी : खराब फॉर्ममुळे ‘टीकेचा धनी’ ठरलेला भारतीय संघ भरकटलेली गाडी रुळावर आणण्याच्या प्रयत्नांत टी-२० विश्वचषकाच्या तिसऱ्या सामन्यात आज बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या लढतीदरम्यान संघ संयोजनावर विशेष भर असेल. या घडामोडीत सतत दुर्लक्षित असलेला अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याला संधी दिली जाईल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून झालेल्या दारुण पराभवामुळे भारताचा उपांत्यफेरीचा मार्ग कठीण झाला. दुसरीकडे अफगाणिस्तानने स्कॉटलॅन्ड आणि नामीबियावर विजय नोंदवून पाकलादेखील पराभवाच्या खाईत ढकलले होते, पण आसिफ अलीने एकाच षटकात चार षटकार खेचून त्यांच्या तोंडचा घास पळविला. त्यामुळे आता मोहम्मद नबी आणि राशिद खान टी-२० लीगमधील सर्व अनुभव पणाला लावून भारताविरुद्ध विजयासाठी खेळतील. या प्रकारात अखेरच्या तीन सामन्यांत नेतृत्व करणार असलेल्या कोहलीकडूनही उत्कृष्ट संघ निवडीची अपेक्षा राहील. विजयासाठी कोहली ॲन्ड कंपनीला अनुभव पणाला लावण्याची गरज असेल.
अफगाणचे वेगवान गोलंदाज हामिद हसन आणि नवीन उलहक हे चांगला मारा करतात. त्यांच्यापुढे राहुल आणि रोहित यांची फटकेबाजी कशी होईल, हे पाहावे लागेल. सूर्यकुमार फिट असल्यास खेळेल तर ईशान किशनला हार्दिक पांड्याऐवजी स्थान मिळण्याची शक्यता आहे. मधल्या टप्प्यात राशिद आणि गुलबदीन नैब यांचा मारा भारताला सावधपणे खेळावा लागणार आहे. विजय मिळविला तरी भारताची मोठी उपलब्धी ठरेल,असे मुळीच नाही, पण सामना गमावल्यास टीकाकारांचा आवाज आणखी बुलंद होईल, याचे विराटला चांगले भान आहे.
n अश्विनसारख्याला बाहेर ठेवल्यावरून आता प्रश्न विचारले जात आहेत. क्रिकेट विश्वात हे पहिलेच उदाहरण असेल की सध्याच्या पिढीचा सर्वांत यशस्वी खेळाडू सहा महिन्यांपासून संघात तर आहे पण अंतिम एकादशमध्ये त्याला स्थान दिले जात नाही. चार वर्षांनंतर अश्विन मर्यादित षटकांच्या संघात परतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोहलीची अश्विनला संघात घेण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामागे त्याचा ‘अट्टहास’ हेच एकमेव कारण मानले जाते.
n वरुण चक्रवर्तीच्या अपयशानंतर अनुभवाला किती महत्व असते, हे सिद्ध झाले. कौशल्य आणि चाणाक्षवृत्तीत भारताचा कोणताही फिकी गोलंदाज अश्विनच्या जवळपास नाही. त्याच्या विरोधात जाणारी एकमेव बाब म्हणजे सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव. यामुळेच चार वर्षांआधी तो संघाबाहेर झाला. अफगाणचे सलामीवीर हझरतउल्लाह झझाई आणि मोहम्मद शहजाद यांना अश्विनचा मारा खेळणे कठीण जावू शकेल. मात्र कोहलीचे अश्विनकडे पुन्हा एकदा डोळेझाक केल्यास संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांकडून पुन्हा प्रश्न उपस्थित होतील. यामागे क्रिकेटशी संबंधित कारण आहे का? अशी विचारणा होईल.