India vs Afghanistan T20I Live - भारत-अफगाणिस्तान यांच्यातला तिसरा ट्वेंटी-२० सामना रोमहर्षक झाला. भारताच्या २१२ धावांच्या उत्तरात अफगाणिस्तानने २१२ धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि सुपर ओव्हरमध्ये भारताला त्यांनी बरोबरीच्या १६ धावांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे पुन्हा एक सुपर ओव्हर खेळवली गेली. त्यात रवी बिश्नोईने कमाल करताना दोन विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला. भारताने ही मालिका ३-० अशी जिंकली. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम रोहितने नावावर करताना महेंद्रसिंग धोनीला ( ४१) मागे टाकले.
सुपर ओव्हरचा थरार...अफगाणिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीला आला आणि गुलबदीन नईब पहिल्याच चेंडूवर रन आऊट झाला. मोहम्मद नबी व गुरबाज नईम यांनी १६ धावा उभारल्या. भारताला विजयासाठी १७ धावांचे लक्ष्य दिले गेले. रोहित शर्माने पहिल्या चेंडूवर बाय धाव घेतली.. यशस्वी जैस्वालने एक धाव घेत रोहितला संधी दिली. त्यानंतर रोहितने दोन षटकार खेचले आणि मॅच २ चेंडूंत ३ धावा अशी आणली. पाचव्या चेंडूवर रोहितला एक धाव घेता आली. १ चेंडूंत २ धावा यशस्वीला करायच्या होत्या. रोहितने स्वतःला रिटायर्ट आऊट करताना रिंकू सिंगला पाठवले. पण, १ धाव आल्याने पुन्हा एक सुपर ओव्हर झाली.
दुसरी सुपर ओव्हर....रोहित शर्माने ६,४,१ अशी सुरुवात करून दिली. रिंकू सिंग चौथ्या चेंडूवर झेलबाद झाला आणि संजू सॅमसन मैदानावर आला. पण, त्याचा फटका चूकला आणि रोहित धाव घेण्यासाठी पळाला. यष्टिरक्षकाने अचूक नेम साधून रोहितला ( ११) रन आऊट केले. दोन विकेट गेल्याने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी १२ धावांचे लक्ष्य राहिले. रवी बिश्नोईला हे षटक दिले गेले आणि त्याने पहिल्याच चेंडूवर मोहम्मद नबीला झेलबाद केले आणि बिश्नोईने तिसऱ्या षटकात गुरबाजची विकेट घेऊन भारताचा विजय पक्का केला.
२०-२० षटकांच्या लढतीत नेमकं काय घडलं?भारताची अवस्था ४ बाद २२ अशी झाली होती. पण, रोहित शर्मा व रिंकू सिंग यांनी पाचव्या विकेटसाठी १९० धावांची विक्रमी भागीदारी केली. रोहितने ६९ चेंडूंत ११ चौकार व ८ षटकारांसह नाबाद १२१ धावा केल्या, तर रिंकूनेही ३९ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६९ धावांची वादळी खेळी केली आणि संघाला ४ बाद २१२ धावांपर्यंत पोहोचवले.
अफगाणिस्तानचे सलामीवीर इब्राहिम जादरान ( ५०) व रहमनुल्लाह गुरबाज ( ५०) यांनी ९३ धावांची भागीदारी केली. मोहम्मद नबी ( ३४) आणि गुलबदीन नईब हे भारतीय फिरकीपटूंना हाणत होते. या दोघांनी २२ चेंडूंत ५६ धावा जोडल्या. वॉशिंग्टनने ३ षटकांत १८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. ६ चेंडूंत १९ असा आणला. नईबने १८ धावा करून सामना बरोबरीत सोडवला. नईब ३३ चेंडूंत ५५ धावांवर नाबाद राहिला आणि अफगाणिस्तानच्या ६ बाद २१२ धावा झाल्या.