Join us  

अफगाणिस्तानचा रेकॉर्ड ब्रेकींग कामगिरी; भारताविरुद्धची मॅच बरोबरीत सोडवली

 India vs Afghanistan T20I Live  - अफगाणिस्तान संघाने ट्वेंटी-२० सामन्यातील अशक्यप्राय कामगिरीची आज नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 10:38 PM

Open in App

 India vs Afghanistan T20I Live  - अफगाणिस्तान संघाने ट्वेंटी-२० सामन्यातील अशक्यप्राय कामगिरीची आज नोंद केली. रोहित शर्माचे शतक व रिंकू सिंगच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने २१२ धावांचे लक्ष्य उभे केले. पण, अफगाणिस्तानने कडवी टक्कर देताना ही मॅच बरोबरीत सोडवली.  अफगाणिस्तानच्या आजच्या विजयाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी अनेकांना धडकी भरवली. आता सुपर ओव्हरमध्ये मॅच गेली. 

रोहित व रिंकू सिंग ( Rinku Singh) यांनी मैदान गाजवले. यशस्वी जैस्वाल ( ४) व विराट कोहली ( ०), शिवम दुबे ( १) आणि संजू सॅमसन ( ०) अपयशी ठर्लयाने भारताची अवस्था ४ बाद २२ अशी झाली होती. पण, रोहित शर्मा व रिंकू सिंग ही जोडी मैदानावर शड्डू ठोकून उभी राहिली. रोहितने ६९ चेंडूंत ११ चौकार व ८ षटकारांसह नाबाद १२१ धावा केल्या, तर रिंकूनेही ३९ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६९ धावांची वादळी खेळी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १९० धावांची भागीदारी करताना संघाला ४ बाद २१२ धावांपर्यंत पोहोचवले. रोहित व रिंकू यांनी शेवटच्या षटकात मिळून ३६ धावा जोडल्या. या दोघांनी भारतासाठी शेवटच्या ५ षटकांत १०३ धावांचा पाऊस पाडला.  अफगाणिस्तानचे सलामीवीर इब्राहिम जादरान व रहमनुल्लाह गुरबाज यांनी दमदार सुरूवात करताना १० षटकांत ८५ धावा फलकावर चढवल्या. कुलदीप यादवने ११व्या षटकात भारताला पहिले यश मिळवून दिले. गुरबाद ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५० धावांवर माघारी परतला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने सलग दोन चेंडूंत दोन विकेट्स घेतल्या. ५० धावा करणाऱ्या जादरान याला संजू सॅमसनने समय सूचकता दाखवून स्टम्पिंग केले. पुढच्या चेंडूवर अझमतुल्लाह उमरझई (०) याचा रवी बिश्नोईने झेल टिपला.   अफगाणिस्तानने संघर्ष सुरूच ठेवला होता आणि त्यांना शेवटच्या ३० चेंडूंत ६८ धावा हव्या होत्या, ज्या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अशक्य नक्कीच नव्हत्या. मोहम्मद नबी आणि गुलबदीन नईब हे भारतीय फिरकीपटूंना हाणत होते. रवी बिश्नोईने टाकलेल्या १६व्या षटकात नबीने ४,४,६,१, असे फटके खेचले. आता २४ चेंडूंत ५१ धावा असा सामना जवळ आला. नबी व नईब यांनी १८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. वॉशिंग्टने चतूर मारा करून नबीला माघारी पाठवले. नबीने १६ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३४ धावा केल्या होत्या. १८ चेंडूंत ४६ धावांची गरज असताना संजू सॅमनसने अफगाणिस्तानच्या करिम जनतला डायरेक्ट हिट करून रन आऊट केले.

वॉशिंग्टनने त्याच्या ३ षटकांत १८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. १२ चेंडूंत ३२ धावा अफगाणिस्तानला हव्या होत्या आणि आवेश खानने १९व्या षटकात नजिबुल्लाह जादरानला ( ५) बाद केले. नईबने फटकेबाजी करून सामना ६ चेंडूंत १९ असा आणला. मुकेश कुमारने पहिला चेंडू वाईड टाकल्यानंतर नईबने पुढचा चेंडू चौकार हाणला. रोहितने क्षेत्ररक्षणात बदल करून नईबवर दडपण टाकले. पण, त्याने ते झुगारून षटकार खेचला आणि २ चेंडू ५ धावा असा सामना जवळ आणला. १ चेंडूंत ३ धावा असताना नईबने २ धावा घेत सामना बरोबरीत सोडवला. 

टॅग्स :भारत-अफगाणिस्तानरोहित शर्मा