भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघ पहिला कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण भारताने ऑस्ट्रेलियापुढे 323 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची चौथ्या दिवसअखेर 4 बाद 104 अशी स्थिही होती. त्यामुळे सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी सहा विकेट्सची गरज असेल. ऑस्ट्रेलिया जर विजय मिळवायचा असेल तर त्यांना 219 धावा कराव्या लागतील.
भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतक झळकावल्यामुळे भारताला तिनशे धावांचा पल्ला ओलांडता आला. पुजाराने यावेळी 9 चौकारांच्या मदतीने 71 धावा केल्या, तर अजिंक्यने सात चौकारांच्या जोरावर 70 धावा केल्या. या दोघांच्या खेळींच्या जोरावर भारताला दुसऱ्या डावात 307 धावा करता आल्या.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करता ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला चांगलीच वेसण घातली होती. भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.