Join us  

Ind vs Aus 1st test live : रोहित शर्माच्या शतकाने इतिहास घडविला; एकाही भारतीय कर्णधाराला न जमलेला विक्रम नोंदवला 

India vs Australia 1st test live score updates : रोहित शर्मा आणि आर अश्विन यांनी भारताच्या डावाला आकार दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 12:58 PM

Open in App

India vs Australia 1st test live score updates : रोहित शर्मा आणि आर अश्विन यांनी भारताच्या डावाला आकार दिला. नाईट वॉचमन म्हणून आलेला अश्विन चांगला खेळला, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. दुसऱ्या दिवस दीड तास रोहितसह उभा राहिल्यानंतर अश्विनची विकेट पडली. पदार्पणवीर टॉड मर्फीने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताला दोन धक्के दिले, परतु Rohit Sharma मैदानावर ठाण मांडून उभा होता. त्याने शतक पूर्ण करून इतिहास घडविला. 

ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजाला जावे लागले हॉस्पिटलमध्ये, जाणून घ्या नेमके काय घडले

रवींद्र जडेजाच्या पाच आणि आर अश्विनच्या तीन विकेट्सच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि यांनी २३ षटकं खेळून काढताना ७६ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपायला ८ चेंडू शिल्लक असताना लोकेश ( २०) बाद झाला. त्यानंतर आर अश्विनला नाईट वॉचमन म्हणून पाठवण्यात आले आणि फिरकीपटूने फलंदाजीत रोहितला दमदार साथ दिली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या दीड तासांत या जोडीने ऑसी गोलंदाजांना सतावले. टॉड मर्फीने १०४ चेंडूंत ४२ धावांची ही भागीदारी संपुष्टात आणली. ६२ चेंडूंत २३ धावा ( २ चौकार व १ षटकार) करणाऱ्या अश्विनला त्याने पायचीत केले.  Ind vs aus scorecard, Ind vs aus live  match

चेतेश्वर पुजारा आज आक्रमक पवित्र्यात दिसला. पण, मर्फीच्या चुकीच्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात तो ७ धावांवर बाद झाला. विराट कोहली व रोहित शर्मा खेळत आहेत. नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर विराटने आधी धाव घेण्यासाठी साद घातली, परंतु ऑसी खेळाडू चेंडूकडे झेपावल्याचे पाहून त्याने रोहितला माघारी पाठवले. हा थ्रो डायरेक्ट असता तर रोहित रन आऊट झाला असता. लंच ब्रेकनंतरच्या पहिल्याच चेंडूवर मर्फीने भारताला धक्का दिला. विराटला ( १२) त्याने बाद केले. नेथन लॉयनने नव्या स्पेलमधील पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवचा ( ८) त्रिफळा उडवला. सूर्यानेही या चेंडूचे कौतुक केले. ( IND vs AUS 1st Test Live Scorecard, Click here ) 

रोहित ९५ धावांवर असताना लियॉनने टाकलेला चेंडू प्रचंड वळला अन् रोहितच्या बॅटची किनार घेत सिली पॉईंटच्या खेळाडूच्या दिशेने गेला. पण, चेंडूचा वेग एवढा होता की तो खेळाडू काहीच करू शकला नाही, रोहितने एक धाव पूर्ण करून सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर चौकार खेचून रोहितने शतक पूर्ण केले. १७१ चेंडूंत त्याने हे शतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून त्याचे हे पहिले कसोटी शतक ठरले. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून शतक  झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला. 

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत शतक झळकावणारा रोहित भारताचा सातवा कर्णधार आहे. यापूर्वी विराट कोहली ( ४), सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी  व अजिंक्य रहाणे ( प्रत्येकी १) यांनी शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वगळता विजय हजारे, मन्सुर अली खान पतौडी, सुनील गावस्कर, कपिल देव व दीलिप वेंगसरकर यांनीही कर्णधार म्हणून कसोटीत शतक झळकावली आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्मा
Open in App