गुवाहाटी : युवा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी येथील बारसापारा स्टेडियमवर तिसऱ्या टी-२० लढतीत विजय मिळविण्यासह ५ सामन्यांची मालिका जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. अंतिम एकादश मध्ये खेळण्याची संधी मिळाल्यास युवा तिलक वर्मा याच्याकडून मोठी कामगिरी अपेक्षित असेल.
वनडे विश्वचषकानंतर श्रेयस अय्यरने विश्रांती घेतली. पण रायपूर आणि बंगळुरू येथील अखेरच्या दोन सामन्यात तो खेळणार आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड ऐवजी उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रेयसकडे जाईल. अय्यर संघात आल्यानंतर तिलक वर्मा बाहेर बसणार आहे. हा बदल संघ संयोजनाबाबत असेल. येथील खेळपट्टी फलंदाजीला पूरक मानली जाते. सामन्याला किमान ४० हजार प्रेक्षक हजेरी लावणार असून भारतीय फलंदाजांकडून फटकेबाजीची त्यांची अपेक्षा असेल.
भारताच्या फलंदाजांनी पहिल्या दोन सामन्यात ३६ चौकार आणि २४ षटकार खेचले. यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, साडेपाच आठवडे बाकावर बसून राहिलेला ईशान किशन आणि रिंकू सिंग हे सर्वजण फिनिशरची भूमिका वठविण्याच्या प्रयत्नांत आहेत. स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्क्स स्टोयनिस आणि ॲडम झम्पा हे ज्येष्ठ ऑस्ट्रेलियन खेळाडू दहा आठवड्यांहून अधिक काळ भारतात आहेत. त्यांच्या चेहऱ्यांवर थकवा जाणवतो. पुढील मालिकेत त्यांना विश्रांतीचीही गरज असेल. हे चौघे पुढच्या महिन्यात बिग बॅश लीग खेळतील. भारतासाठी मागील १२ टी-२० सामने खेळणाऱ्या तिलक वर्माने पहिल्या दोन सामन्यात केवळ १२ चेंडू खेळले. पाचव्या स्थानावर त्याने दहा चेंडूत १२ तसेच त्रिवेंद्रममध्ये दोन चेंडूत नाबाद ७ धावा केल्या. सूर्या त्याला तिसऱ्या सामन्यात आपल्या आधी फलंदाजीला पाठवेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.| भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सामन्यात २०८ धावा दिल्या, मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांचा मारा प्रभावी होता. या दरम्यान त्यांनी पहिल्या लढतीत ४५ आणि दुसऱ्या लढतीत ४४ चेंडू निर्धाव टाकले. त्यांच्याविरुद्ध क्रमश: २४ आणि १२ चौकार लागले. प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीपसिंग याने डेथ ओव्हर मध्ये स्वत:चा मारा सुधारला होता.