ठळक मुद्देऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर आटोपलाजसप्रीत बुमराचा भेदक मारा, 33 धावांत 6 बळीचेतेश्वर पुजारा व विराट कोहली भोपळा न फोडता माघारी
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : जसप्रीत बुमराच्या कमालीच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात 292 धावांची आघाडी घेतली. मात्र, फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय भारताच्या अंगलट आल्याचे चित्र आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताने 346 धावांची आघाडी घेतली, परंतु त्यांचे 5 फलंदाज माघारी परतले आहेत.
भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला आणि त्या उत्तरात मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची चांगलीच तारांबळ उडाली. उपाहारापर्यंत त्यांचे चार फलंदाज तंबूत परतले होते आणि त्यात आणखी दोघांनी भर घातली. ऑसींचे 6 फलंदाज 102 धावांवर माघारी पाठवून भारताने त्यांच्यावर फॉलोऑनचे सावट निर्माण केले. कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्स यांनी संघर्ष केला, परंतु मोहम्मद शमीने ही जोडी तोडली. त्याने कमिन्सला बाद करताना परदेशातील विकेट्सचे शतक पूर्ण केले. त्यानंतर बुमराने ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. बुमराने 33 धावांत 6 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर मार्कस हॅरिस (22) आणि कर्णधार टीम पेन (22) यांनी सर्वाधिक धावा केल्या.पहिल्या डावात 292 धावांची आघाडी घेतलेल्या भारतीय संघाने त्यात आणखी धावांची भर घालणे अपेक्षित होते. मात्र, पॅट कमिन्सने भारताला धक्के दिले. त्याने भारताचे चार फलंदाज अवघ्या 32 धावांवर माघारी पाठवले. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांना भोपळाही फोडता आला नाही. रोहित शर्मालाही ( 5) जोश हेझलवुडने बाद केले.