India vs Australia 3rd test live score updates : तिसरी कसोटी रंजक वळणावर आली आहे. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करून दाखवताना ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. पण, फलंदाजांनी पुन्हा निराश केले. चेतेश्वर पुजाराने ( Cheteshwar Pujara) एकट्याने खिंड लढवताना ५९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने डाव्या स्लीपमध्ये अफलातून झेल घेतला आणि तिथेच सामना फिरला. नॅथन लाएनने ७ विकेट्स घेतल्या.
उस्मान ख्वाजाचा अफलातून झेल अन् भारतीय संघाच्या अडचणीत वाढ; ६ फलंदाज माघारी, Video
भारताची दुसऱ्या डावातही सुरुवात काही खास झाली नाही. पाचव्या षटकात शुभमन गिल ( ५) लाएनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर लाएनने १५व्या षटकात रोहितला (१२) पायचीत केले. चेतेश्वर पुजारा एका बाजूने चांगला खेळ करताना दिसला. विराट कोहली त्याला साथ देईल असे आशादयक चित्र दिसत असताना किंग कोहली चुकीचा फटका मारायला गेला. मॅथ्यू कुहनेमनने त्याला (१३) पायचीत केले. लाएनने तिसरा धक्का देताना रवींद्र जडेजाला ( ७) पायचीत केले. पुजारा एका बाजूने विकेट टिकवून खेळत होता आणि श्रेयस अय्यर आज चांगल्या फॉर्मात दिसला. त्याने ३ चौकार व २ खणखणीत षटकार खेचून २७ चेंडूंत २६ धावा केल्या. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजावीर त्याने टोलावलेला चेंडू उस्मान ख्वाजाने डाईव्ह मारून टीपला.
लाएनने भारताला आणखी एक धक्का देताना केएस भरतचा त्रिफळा उडवला. भारताने ११८ धावांवर सहावा फलंदाज गमावला. दरम्यान, पुजाराने अर्धशतक पूर्ण करताना भारताची खिंड लढवत ठेवली. मार्नस लाबुशेनने त्याचा झेल सोडला अन् पुजारा देवाचे आभार मानताना दिसला. पुजारा व आर अश्विन ( १६) यांची २२ धावांची भागीदारी लाएनने तोडली. त्याची ही डावातील पाचवी विकेट ठरली अन् त्याने २३ वेळा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. डोकेदुखी ठरलेल्या पुजाराची विकेट मिळवण्यात अखेर लाएनला यश आले. स्टीव्ह स्मिथने डाव्या स्लीपमध्ये अफलातून झेल घेतला. पुजारा १४२ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५९ धावांवर माघारी परतला. उमेश यादव षटकार मारण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर झेलबाद झाला. लाएनची ही सातवी विकेट ठरली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"