India vs Australia 3rd test live score updates : तिसरी कसोटी रंजक वळणावर आली आहे. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करून दाखवताना ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. पण, यजमानांच्या फलंदाजांनी पुन्हा निराश केले. चेतेश्वर पुजाराने ( Cheteshwar Pujara) एकट्याने खिंड लढवताना ५९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने डाव्या स्लीपमध्ये अफलातून झेल घेतला आणि तिथेच सामना फिरला. नॅथन लाएनने ८ विकेट्स घेताना भारताचा दुसरा डाव १६३ धावांवर गुंडाळला.
भारताची दुसऱ्या डावातही सुरुवात काही खास झाली नाही. पाचव्या षटकात शुभमन गिल ( ५) लाएनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर लाएनने १५व्या षटकात रोहितला (१२) पायचीत केले. चेतेश्वर पुजारा एका बाजूने चांगला खेळ करताना दिसला. विराट कोहली त्याला साथ देईल असे आशादयक चित्र दिसत असताना किंग कोहली चुकीचा फटका मारायला गेला. मॅथ्यू कुहनेमनने त्याला (१३) पायचीत केले. लाएनने तिसरा धक्का देताना रवींद्र जडेजाला ( ७) पायचीत केले. पुजारा एका बाजूने विकेट टिकवून खेळत होता आणि श्रेयस अय्यर आज चांगल्या फॉर्मात दिसला. त्याने ३ चौकार व २ खणखणीत षटकार खेचून २७ चेंडूंत २६ धावा केल्या. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजावीर त्याने टोलावलेला चेंडू उस्मान ख्वाजाने डाईव्ह मारून टीपला.
लाएनने भारताला आणखी एक धक्का देताना केएस भरतचा त्रिफळा उडवला. भारताने ११८ धावांवर सहावा फलंदाज गमावला. दरम्यान, पुजाराने अर्धशतक पूर्ण करताना भारताची खिंड लढवत ठेवली. मार्नस लाबुशेनने त्याचा झेल सोडला अन् पुजारा देवाचे आभार मानताना दिसला. पुजारा व आर अश्विन ( १६) यांची २२ धावांची भागीदारी लाएनने तोडली. त्याची ही डावातील पाचवी विकेट ठरली अन् त्याने २३ वेळा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. डोकेदुखी ठरलेल्या पुजाराची विकेट मिळवण्यात अखेर लाएनला यश आले.
स्टीव्ह स्मिथने डाव्या स्लीपमध्ये अफलातून झेल घेतला. पुजारा १४२ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५९ धावांवर माघारी परतला. उमेश यादव षटकार मारण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर झेलबाद झाला. लाएनची ही सातवी विकेट ठरली. त्यानंतर मोहम्मद सिराजला बाद करून लाएनने आठवी विकेट घेतली. भारताचा दुसरा डाव १६३ धावांवर गडगडला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ७६ धावा करायच्या आहेत. लाएनने २३.३-१-६४-८ अशी गोलंदाजी केली.
तत्पूर्वी, भारतीय संघाला पहिल्या डावात १०९ धावाच करता आल्या. मॅथ्यू कुहनेमन याने १६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. नॅथन लाएनने तीन, तर टॉड मर्फीने १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात ट्रॅव्हीस हेड ( ९) लगेच माघारी परतला. उस्मान ख्वाज ( ६०) आणि मार्नस लाबुसेन ( ३१) यांनी ९६ धावांची भागीदारी केली. स्टीव्ह स्मिथ ३८ चेंडूंत २६ धावा करून माघारी परतला. पीटर हँड्सकोम्ब ( १९) व कॅमेरून ग्रीन (२१) हे दुसऱ्या दिवशी खिंड लढवत होते. त्यांनी पहिल्या सत्रातील ड्रींक्स ब्रेकपर्यंत ३० धावा जोडल्या. पण, त्यानंतर रोहितने गोलंदाजीला आर अश्विनला आणले आणि फिरकीपटूने कमाल केली. ४ बाद १८६ वरून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर गडगडला. त्यांना ८८ धावांचीच आघाडी घेता आली.
Web Title: India vs aus 3rd test live scorecard Indore : 8 wicket haul by Nathan Lyon, Cheteshwar Pujara dismissed for 59, Australia needs 76 runs to win, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.