India vs Australia 3rd test live score updates : मालिकेत २-० अशा पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी केली. भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळल्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन या जोडीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली. दिवसाच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा दोन वेळा बाद होता, परंतु ऑस्ट्रेलियाने DRS घेण्याचं धाडस दाखवलं नाही अन् त्याला जीवदान मिळाले. त्याचा फार उपयोग काही झाला नाही. एकीकडे ऑस्ट्रेलिया DRS घेण्यात चाचपडत होते, तर दुसरीकडे रोहित धडाधड DRS घेताना दिसला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर त्याने चार वेळा DRS वापरला अन् ते त्यापैकी ३ वाया गेले. त्यामुळे आर अश्विनच्या गोलंदाजीवर विकेट असूनही ती मिळाली नाही. जडेजाने नंतर चार विकेट्स घेत याची भरपाई केली. पण, आता भारताचा एकही DRS शिल्लक नाही.
रवींद्र जडेजाने इतिहास घडविला! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'भारी' विक्रम नोंदवला; ऑसींना दिला धक्का
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन जीवदान मिळूनही रोहित शर्मा १२ धावांवर बाद झाला. शुबमन गिल ( २१), चेतेश्वर पुजारा ( १) व श्रेयस अय्यर ( ०) हेही माघारी परतले. विराट कोहली व केएस भरत यांनी २५ धावांची भागीदारी केली. विराट ५२ चेंडूंत २२ धावांवर LBW झाला. बघता बघता भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गडगडला. विराटने सर्वाधिक २२, गिलने २१ आणि केएस भरतने १७ धावा केल्या. मॅथ्यू कुहनेमन याने १६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. नॅथन लियॉनने तीन, तर टॉड मर्फीने १ विकेट घेतली.
ट्रॅव्हीस हेड व उस्मान ख्वाज यांनी सावध खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु रवींद्र जडेजाने धक्का दिला. सहाव्या षटकात जडेजाने ऑसी सलामीवीराला ( ९) पायचीत केले. रवींद्र जडेजासाठी कर्णधार रोहितने दोन वेळा DRS घेतला परंतु दोन्ही DRS वाया गेले. पण, जेव्हा अश्विनच्या गोलंदाजीवर मार्नस लाबुशेनसाठी DRS घेण्याची गरज होती तेव्हा रोहितने टाळले. नेमके त्याचवेळी रिप्लेत लाबुशेन वाद असल्याचा दिसला अन् रोहित खुदकन हसला.
ख्वाजासह भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवणाऱ्या लाबुशेनला जडेजाने बाद केले. लाबुशेन ९१ चेंडूंत ३१ धावांवर त्रिफळाचीत झाला. ख्वाजाने अर्धशतकी खेळी करताना लाबुशेनसह १९८ चेंडूंत ९६ धावांची भागीदारी केली. ख्वाजा एकाबाजूने खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभा होता आणि कर्णधार स्मिथसोबत तो आणखी डोकेदुखी वाढवेल असेच चित्र होते. पण, जडेजाच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात शुभमन गिलने सीमारेषेनजीक त्याचा झेल टिपला. ख्वाजा १४७ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ६० धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर ४ बाद १५६ धावा करताना ४७ धावांची आघाडी घेतली. स्टीव्ह स्मिथ ३८ चेंडूंत २६ धावा करून माघारी परतला. जडेजाने ६३ धावांत ४ विकेट्स घेतल्या.