India vs Australia 3rd test live score updates : स्टीव्ह स्मिथच्या चतुर खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी अडीच दिवसांत जिंकली. ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटीत जबरदस्त कमबॅक करताना ९ विकेट्सने बाजी मारली आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत १-२ अशी पिछाडी कमी केली. भारताचे ७६ धावांचे लक्ष्य ऑसींनी सहज पार केले. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथने ( Steve Smith) सक्षमपणे सांभाळले आणि १० वर्षांत भारतात यजमानांना दोन कसोटींत पराभूत करणारा तो पहिला कर्णधार ठरला. या विजयामुळे स्मिथचा आत्मविश्वास उंचावला आहे.
भारतीय संघाला पहिल्या डावात १०९ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर गडगडला. रवींद्र जडेजा ( ४-७८), आर अश्विन ( ३-४४) आणि उमेश यादव ( ३-१२) यांनी उल्लेखनीय गोलंदाजी केली. चेतेश्वर पुजाराने ५९ धावांची खेळी करून खिंड लढवली. भारताचा दुसरा डाव १६३ धावांवर गडगडला. नॅथन लाएनने २३.३-१-६४-८ अशी गोलंदाजी केली. आर अश्विनने नव्या चेंडू चांगलाच वळवला अन् दुसऱ्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला बाद केले. पण, मार्नस लाबुशेन व ट्रॅव्हिस हेड यांनी आक्रमक फटकेबाजी केली आणि पटापट धावा केल्या. हेडने ५३ चेंडूंत नाबाद ४९ धावा केल्या. लाबुशेनने नाबाद २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने १८.३ षटकांत १ बाद ७८ धावा करून सामना जिंकला आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली.
स्टीव्ह स्मिथ म्हणाला, ''आमच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. विशेषतः कुहनेमन.. अन्य गोलंदाजांनीही चांगले योगदान दिले. फलंदाजीबाबत उस्मान ख्वाजने पहिल्या डावात चांगला खेळ केला. आम्ही चांगल्या भागीदारीही केल्या. भारतीय गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली होती. काल आमचा डाव गडगडला. पुज्जी ( चेतेश्वर पुजारा) च्या खेळीचं विशेष कौतुक, परंतु आमचे गोलंदाज सरस ठरले. हा सर्वसमावेशक परफॉर्मन्स होता.''
आता पूर्णवेळ कर्णधारपद भूषविण्यासाठी सज्ज आहेस का, असा प्रश्न येताच स्मिथ म्हणाला, आम्ही सध्या पॅट कमिन्सचा विचार करतोय, आमच्या प्रार्थना त्याच्यासोबत आहेत. भारतात नेतृत्व करायला मला आवडते, येथील खेळपट्टी मला चांगल्या समजतात. येथे मी नेतृत्वाचा आनंद लुटतो. पण, मी माझी जबाबदारी पार पाडलेली आहे आणि हा पॅट कमिन्सचा संघ आहे. याच आत्मविश्वासाने आम्ही चौथ्या कसोटीत मैदानावर उतरणार आहोत, आशा करतो की मालिकेचा शेवट गोड करू.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"