India vs Australia 4th test live score updates : ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात भारतानेही चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रोहित बाद झाल्यानंतर शुबमनने अनुभवी चेतेश्वर पुजारासह भारताचा डाव सावरताना दुसऱ्या विकेटसाठी २४८ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. शुबमनने कसोटीतील दुसरे शतक पूर्ण करताना भारताला मजबूत स्थितीत आणले. कॅलेंडर वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो चौथा भारतीय ठरला. त्याने २०२३ मध्ये वन डेत द्विशतक, ट्वेंटी-२०त शतक आणि आज कसोटीत शतक झळकावले. यापूर्वी कॅलेंडर वर्षात रोहित शर्मा, सुरेश रैना व लोकेश राहुल यांनी हा पराक्रम केला होता.
रोहित व गिल यांची ७४ धावांची भागीदारी संपुष्टात आली. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बॅकफूटवर जाऊन खणखणीत चौकार खेचून शुबमन गिलने अर्धशतक पूर्ण केले. शुबमन व चेतेश्वर पुजारा यांनी भारतासाठी खिंड लढवली आहे. पण, स्टीव्ह स्मिथच्या चतुर क्षेत्ररक्षणात त्यांना धाव शोधताना संघर्ष करायला लावले. १२-१३ षटकं भारताच्या या जोडीला एकही चौकार खेचता आला नाही आणि दीडच्या सरासरीनेच धावा करता आल्या. स्मिथची फिल्ड प्लेसमेंट भारताच्या धावांवर अंकुश ठेवून होती.
अखेर ९६ चेंडूंनंतर शुबमनने भारताला चौकार मिळवून दिली. त्याने कॅमेरून ग्रीनला दोन खणखणीत चौकार खेचले. त्यानंतर शुबमनने त्याचे शतकही पूर्ण केले. त्याने १९४ चेंडूंत कसोटीतील दुसरे शतक पूर्ण केले, अहमदाबाद येथे शतक झळकावणारा तो भारताचा पाचवा सलामीवीर ठरला. ऑस्ट्रेलियाच्या ४८० धावांच्या प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या दिवसाच्या टी ब्रेकपर्यंत २ बाद १८८ धावा केल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"