India vs Australia 4th test live score updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियात एक दु:खद बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कसोटी कर्णधार पॅट कमिन्सच्या आईचे निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्याची काळजी घेण्यासाठी कमिन्सने पहिल्या दोन कसोटीनंतर मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या कठीण काळात ते कुटुंबासोबत घरी आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, कमिन्सची आई मारिया कमिन्स यांचे काल रात्री निधन झाले. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. अहमदाबाद कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शोक व्यक्त करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचे खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून खेळतील.
भारताविरुद्ध नागपूर आणि दिल्ली कसोटी सामन्यातील पराभवानंतर, त्यांचा नियमित कसोटी कर्णधार पॅट कमिन्स वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतला. कमिन्सच्या आईची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे कमिन्स इंदूर कसोटी सामन्यासाठी परतू शकला नाही. त्यानंतर चौथ्या कसोटीसाठी कमिन्सचे पुनरागमन होईल असे मानले जात होते परंतु परिस्थिती बिघडल्याने त्याने घरीच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच सध्या कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसत आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस नावावर ठेवला. सलामीवीर उस्मान ख्वाजा ( Usman Khwaja) भारतीय गोलंदाजांसमोर शड्डू ठोकून उभा राहिला आहे. त्याच्या शतकी खेळीला कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या अनुभवाची जोड आणि कॅमेरून ग्रीनची आक्रमक फटकेबाजीची साथ मिळाली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रॅव्हीस हेड ( ३२), मार्नस लाबुशेन ( ३) हे माघारी परतल्यानंतर ख्वाजाने एकहाती खिंड लढवली. ख्वाजा व स्टीव्ह स्मिथ यांनी २४८ चेंडूंतील ७९ धावांची भागिदारी करताना भारताची डोकेदुखी वाढवली. स्मिथ १३५ चेंडूंत ३८ धावांवर माघारी परतला.
मोहम्मद शमीने डावातील दुसरी विकेट घेताना पीटर हँड्सकोम्बाला ( १७) त्रिफळाचीत केले. कॅमेरून ग्रीन व ख्वाजा यांनी झटपट धावा जोडताना ११६ चेंडूंत नाबाद ८५ धावांची भागीदारी केली. ख्वाजाने भारताविरुद्ध पहिले शतक झळकावले आणि त्याचे हे एकंदर १४ वे कसोटी शतक ठरले. ख्वाजा १०४ धावांवर, तर हँड्सकोम्ब ४९ धावांवर नाबाद आहेत. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या ४ बाद २५५ धावा झाल्या होत्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"